भाग दहा : निसर्गाचा अद्भुत नजराणा ‘जीरो व्ह्याली’

    14-Jun-2022
Total Views |

bhag101
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : उगवत्या सूर्याचा प्रदेश असणारा अरुणाचल ! सामरिकद्रुष्ट्या अत्यंत महत्वाचे सीमावर्ती राज्य! एका बाजूला बलाढ्य चीन, तिबेट, उत्तर पश्चिमेला भूतान, पूर्वेस म्यांमार अशा आतरराष्ट्रीय सीमा. पूर्वीचा नेफा (नॉर्थ इस्ट फ्रंटीयर एजन्सी ) आपल्याला १९६२ च्या चीनी आक्रमणाची आठवण देतो. डोक्यावर हिमालयाच्या उंच दुर्गम रांगा, तर दक्षिणेला आसाम आणि याच आसाम आणि अरुणाचलची जणू नैसर्गिक सीमा झालेला आणि लंब रेषेत वाहणारा अजस्त्र जलस्त्रोत ब्रम्हपुत्र!
 
अरुणाचलचा प्रत्येक जिल्हा विशिष्ट जनजाती आणि नद्यांच्या नावावरून ओळखला जातो, कामेंग, सुबनसरी, सियांग, लोहित, तिराप या नद्या आणि त्याच नावांचे जिल्हे. उपासनेचा विचार केल्यास अरुणाचलाला तीन प्रकारात विभाजित करता येईल. पहिला समूह हा तवांग आणि कामेंग जिल्ह्यात मुख्यतः भगवान बुद्धाला, लामा परंपरेला, तिबेटीयन बुद्धिझमला मानणारा मोनपा आणि शार्दुकपेन ह्या जनजातींचा. हे लोक महायान पंथाचे आहेत, तर अति पूर्वेला खामटी आणि सिंगपो हे हीनयान बुद्धिझमला मानणारे आहेत. दुसरा समूह हा सूर्य-चंद्राला मानणारा आहे यात आदी, निशिंग, बांगनी, मिशमी, मिजी, तांगसा, आपातानी ह्या जनजाती. मूळ पुरुष आबोतानी आणि दोन्यी-पुलो म्हणजे सूर्य-चंद्रला मानणारे हे लोक, ‘तानी’ ग्रुप समूह या नावाने ओळखला जातो. हा साधारण मध्य अरुणाचलात राहतो. तिसरा समूह नोक्ते, वांचो, हे तिराप ह्या नागालँड जवळच्या जिल्ह्यात राहणारे किंचित वैष्णव लोकांचा म्हणता येईल. जसे सियांग जिल्हा हा आदी जनजातींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर पापुम्पारे, अप्पर सुबनसरी हा मुख्यतः निशी आणि लोवर सुबंसरीत आपातानी जनजातीचे लोक राहतात.
 
bhag102 (Image Source : Prasad Barve)
 
राजधानी इटानगरपासून १२० km असणारे आपातानी वस्ती म्हणून ओळखले जाणारे आणि युनेस्को वर्ल्ड हेरीटेजच्या यादीत सामील झालेले ‘झीरो’ किंवा ‘जीरो व्ह्याली’ म्हणजे निसर्गाचा अद्भुत नजराणा आहे यात शंका नाही. जिकडे नजर जाईल तिकडे भरपूर प्रमाणात असलेले सुंदर पाईन हे झीरोचे वैशिष्ट्य. आजूबाजूला उंच हिरवे निळे डोंगर रांगा आणि त्यामध्ये २५ गावांचा सपाट प्रदेश, साधारण १० km एवढा असावा. ‘हापोली’ हे जिल्हा मुख्यालय. या हापोली पासून आपण नागमोडी वळणाच्या रस्त्याने, दुतर्फा हिरव्या पिवळ्या भात शेताच्या मधून या मानव आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा आस्वाद घेत हापोलीपासून ६ km वर असलेल्या ‘झीरो’ ला कधी पोचतो हे कळत सुद्धा नाही. मी ‘झीरोला’ असताना विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही हापोली ते झीरो अशी म्यारेथोन दौड आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा बक्षिसे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात झाला होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी साहेब आले होते.
 
या वाटेने जाताना होंग, बुला, हिजा, हारी, नानी, बिरी अशा काही आपातानी वस्त्या लागतात. यापैकी एखाद्या वस्तीचे आकर्षक स्वागतद्वार आपल्याला आपलेसे वाटेल... खुणावेल तर त्यास नाही म्हणू नका. खरी लोकवस्ती, रहनसहन, खानपान, जमिनीपासून ५-६ फुट उंचावर असलेली बांबूची घरे, घरांच्या खाली लाकडी फोडलेले रचलेले सरण, त्यातच फिरणारी डुकरे, बकऱ्या, कोंबड्या इ पाळीव प्राणी. वस्तीत शिरल्यावर उंचावर असलेले समूह बैठक स्थान ‘लापांग’ आणि उंचच उंच जुन्या tv antina सारखे दिसणारे ‘बाबो’ आपले लक्ष वेधतात. या दोन बाबोंच्या मध्ये वेताची दोरी बांधून त्यावर फार पूर्वी तरुण मुले झोके घेत, खेळ करीत. स्त्रिया-नाकावर कपाळावर, हनुवटीवर रेषा ओढून काढलेले टाटयू काढलेल्या जेष्ठ स्त्रिया आपल्याला दिसतील. आपातानी स्त्रिया या सुंदरते मध्ये वरच्या क्रमाकांवर येतील. पूर्वी टोळी युधासारखे प्रकार होते. शत्रूपासून वाचण्यासाठी आपली हिच सुंदरता नष्ट करण्यासाठी असा चेहरा विद्रूप केल्या जात असे.
 
पायरीनुमा शिडी चढून एखाद्या घरात गेल्यास तिथे आपले स्वागत अलुमिनियमच्या मगात किंवा ओल्या बांबूच्या हिरव्या कपात ‘अपुंग’ नावाचे थोडे उग्र वास आणि चवीचे पेय दिल्या जाते. तांदूळ सडवून केलेले हे पेय शरीरात उष्णता निर्माण करण्यास उपयोगी आहे. पाच हजार फुटावर असलेले हे थंड हवेचे ठिकाण त्यामुळेच सुसह्य होते. स्वयंपाकघरात मधोमध चौकोनी जागेत तिवई आणि तिच्या खाली दोनतीन बांबू किंवा लाकडे घरातली उष्णता वाढवतात. तिच्यावर एका झोक्यावर जळण लाकडे व्यवस्थित टांगून ठेवली असतात. बाहेर पडणारा पाऊस आणि तोंडातून वाफा काढणारी थंडी असे वातावरण. घरातील त्या मंद उष्णतेत, बांबूच्या ठेंगण्या स्टूलावर बसून यजमानाने प्रेमाने आग्रहाने दिलेला अपुंगचा बांबू मग (प्याला म्हणा हवं तर) आणि भात, लाई पाता भाजी, सोबत सामिष डिश अशी स्पेशल थाळी पुढ्यात आल्याच्या अप्रतिम आठवणी कधीतरी जाग्या होतात.
 
bhag103 (Image Source : Prasad Barve)
 
 
असो, मी असतानाचे ९२-९३ चे झीरो आता पार बदलले आहे. आता अरुणाचलचे लोक पर्यटकांचे आनंदाने स्वागत करायला उत्सुक आहेत. व्यावसायिकतेचा नवा रंग झीरोवर चढल्याचे जाणवते. एका नव्या आकर्षक झीरोचे दर्शन घडते. २०१२ मध्ये सुरवात झालेला ‘झिरो म्युसिक फेस्टिवल’ आता देशभरात प्रसिद्ध झाला आहे. साधारण सप्टेंबर महिन्यातील हे ४ दिवस म्हणजे धमाल, मस्ती, गप्पा आणि गाणी यांची मेजवानी असते. पॉप, फ्यूजन, हिप हॉप, जैज आदी प्रकार तरुणाईला आकर्षित करतात. पूर्वांचलातील अनेक गुणी गायक, वादक, band artist आपली कला येथे सादर करतात याबरोबरच अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला येथे सादर करतात. झीरो म्युझिक फेस्टिवल चे हे ४ दिवसाचे तिकीट भाडे ५००० रु वर्थ आहेत. हापोली-झीरोत होम स्टे, हॉटेल्सची उपलब्धता आहे.
 
याचुली जवळ असलेले ‘सिखे लेक’ नावाचे सुंदर तळे, हेरीटेज पार्क, आपली जुनी ओळख आठवणीत राहावे म्हणून बनणारे नवे मुंपा म्युझियम, जिल्हा मुझीयम, क्राफ्ट एम्पोरियम, हापोली पासून ४.५ km वर कार्दो येथील २५ फुट उंच इतके प्रचंड आकाराचे शिवलिंग हे बघण्यासारखे आहे. श्रावण महिन्यात जंगलात झाडे तोडताना लाकूडतोड्याला ही शिवलिंग सापडली. शिव पुराणात 17 व्या अध्यायात याविषयीचा संदर्भ आढळतो अशी येथील लोकांची धारणा आहे. शेती हंगामाचे स्वागत करणारा जुलै महिन्याच्या ५ तारखेला साजरा होणारा ‘ड्री फेस्टिवल’ आपल्याला आपातानी सामुहिक उत्सवाचे विलोभनीय दर्शन घडवेल, आनंद देवून जाईल त्यातील दामिंदा नृत्य, त्यांचे पोशाख मनाला मोहून टाकतील. मुळातच ह्या जनजाती ह्या उत्सव प्रेमी, निसर्ग पूजक आहेत.
 
निसर्गाने समृद्ध केलेला हा प्रदेश येथील आपातानी बुद्धिमत्तेने अधिक सुखकर केला आहे . तर पावसाळा संपल्यानंतर केंव्हाही जायला सज्ज व्हा .... सुंदरतेने नटलेले आणि एकदा अवश्य भेट देण्यासारखे आपतानी जनजातीचे नयनरम्य ... झीरो... ziro ...!
 
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.