भाग नऊ : ऐतिहासिक रुक्मिणीहरणाची महती सांगणारे अरुणाचलमधील ‘मालिनीथान’

    14-Jun-2022
Total Views |

bhag91(Image Source : Prasad Barve) 
 
नागपूर : अरुणाचलात गेल्यास पाहण्याजोगे पौराणिक व ऐतिहासिक स्थान म्हणजेच ‘मालिनीथान’ असे आपणास जरूर म्हणता येईल. तसे पाहिल्यास अरुणाचलात प्रवेश केल्यावर आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल इतका सुंदर निसर्ग आहे. हिरवेकंच उंच डोंगर, खळखळ आवाज करत वाहणाऱ्या अवखळ नद्या, मध्ये-मध्ये दिसणारी आणि जमिनीपासून चार पाच फुट उंचावर बांधलेली झोपडीवजा लांबच्या लांब बांबूची घरे, थंडगार हवा, वर निळ्या आकाशात काळ्या-पांढऱ्या ढगांची दाटी, मधूनच पडणारा पाउस, दूर डोंगरात दिसणारे इंद्रधनुष्य...मध्य-पूर्व अरुणाचलातील सियांग जिल्ह्यातील पासीघाट हे महत्वाचे जिल्हा केंद्र. अरुणाचलात शिक्षणाचा श्रीगणेशा येथे झाला असे म्हणावयास हरकत नाही. शाळा-कॉलेज असलेले, राजकीय आणि सामाजिक पुढारलेल्या ‘आदी’ जमातीचे हे स्थान.
 
अरुणाचलात ‘इंडीजिनस फेथ मुव्हमेंट’ ची पायाभरणी करणारे आणि भगवान सूर्य मंदिरांची उभारणी करणारे स्व. तालोम रुक्बो जी यांचे हे स्वस्थान. केवळ तंत्र मंत्रात असणारे भगवान सूर्यदेव प्रत्यक्ष सगुण साकार रुपात साकारण्याचे, त्याची विधी-विधान नेमून पूजा-पद्धती विकसित करणारे स्व. तालुम रुक्बो जी खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आधुनिक संत होते. त्यांचा सहवास, परिचय आम्हाला लाभला हे आमचे भाग्य समजतो. आज त्यांनी निर्माण केलेला ‘दोनी-पोलो’ उत्सव राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वधर्म रक्षा आंदोलनाची जेथे सुरवात झाली ते हे पासीघाट.
 
तर या पासीघाट जवळच असलेल्या लेकाबाली जवळचे हे मालिनिथान मंदिर! या अनोख्या मंदिराकडे बाय रोड / रस्त्याने जाताना आपल्याला एकाबाजूला आसामचा धेमाजी जिल्हा लागतो तर दुसऱ्या बाजूला अरुणाचलचा लोवर सियांग जिल्हा. मैदानी प्रदेश संपतो अन पहाडांनी वेढलेले आणि किंचित टेकडावर असलेले लाल शेंदरी रंगाचे मंदिर दिसू लागते. पार्किंगला भरपूर जागा आहे. चढण्यासाठीच्या मार्गावर प्रशस्त कठडे आहेत. पायऱ्या बांधून घेतल्या आहेत.
 
bhag92 (Image Source : Prasad Barve)
 
या मंदिराशी जोडलेली एक अनोखी लोककथा आहे. येथे जवळच भीष्मक नगर नावाचे ठिकाण आहे. श्रीकृष्णपत्नी देवी रुक्मिणीचे पिता राजा भीष्मकांचे हे राज्य. इसवी सनाच्या १२ व्या १३ व्या शतकामध्ये आसामच्या सुतीया राजांनी बांधलेल्या राजधानीचे किल्लेनुमा अवशेष आजही येथे आहेत. या भीष्मक नगराच्या बाजूने ‘कुंडील’ नावाची नदी वाहते. राजा भिष्मकाचे ‘कौंडीन्यपूर’ ते हेच असावे असा येथील जनजातींचा विश्वास आहे.
 
‘चेदी नरेश’ शिशुपालाशी ठरवलेला विवाह मला मान्य नाही असे म्हणत देवी रुक्मिणीने श्रीकृष्णास कळकळीची विनंती करते. आपल्या प्रियतमेची ही आर्त हाक कानी पडताच श्रीकृष्ण योजना आखतात आणि शिशुपाल - रुक्मिणी विवाहाच्या एक दिवस अगोदर आपल्या प्रियसखी रुक्मिणीस येथून पळवून घेऊन जातात अशी कथा आहे. स्थानीय इदू मिशमी जमातीचे लोक आम्ही रुक्मिणीचे, राजा भिष्मकांचे वंशज आहोत असे अभिमानाने सांगतात. रुक्मिणीचे हरण केल्यावर, भगवान श्रीकुष्ण आणि देवी रुक्मिणी द्वारकेला निघाले असतानाचा पहिला थांबा घेतात ते हे ‘मालिनीथान’ किंवा मालिनीस्थान!
 
भगवान शंकर आणि माता पार्वती यावेळी येथे आलेले आहेत. सुंदर फुलांचा बगिच्या माता पार्वतीने येथे बनविला आहे. श्रीकुष्ण आणि भगवान शंकराची भेट होते. याप्रसंगी या नवविवाहित दांपत्याचे स्वागत माता पार्वती आपल्या बगीच्यातील सुंदर फुलांची माला बनवून करते. श्रीकृष्णांना ही पुष्पमाला फार आवडते आणि ते पार्वतीस ‘मालिनी’ बगिच्याची मालकीण या अर्थाने संबोधतात. या दोघांचे आगत-स्वागत भगवान शंकर आणि माता पार्वती येथे करतात आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे नव दाम्पत्य पुढे रथामधून द्वारकेस रवाना होतात. अशी लोककथा या स्थानाची आहे.
 
 
bhag93 (Image Source : Prasad Barve)
 
भगवान श्रीकृष्ण पुर्वांचलात आपले अस्तित्व अनेक ठिकाणी आणि अनेक प्रसंगात दाखवतात. १४ व्या १५ शतकात आसामच्या सुतीया राजवंशातील ‘लक्ष्मी नारायण’ या राजाने याच कथेला अनुसरून येथे एक मंदिर बांधले होते. पुरातत्व विभागाने इसविसन १९६८ ते १९७१ या दरम्यान येथे केलेल्या खोदकामात पुरातन अवशेष सापडले. ग्रानाईट दगडाचा उपयोग या मंदिर बांधकामात झाल्याचे दिसते. एक भग्न मंदिराचा सात आठ फुट उंच असलेला पायवा/चौथरा आणि एका बंद जाळीत सापडलेल्या मूर्ती, आमलक, काही स्तंभ इ मंदिराचे अवशेष येवढेच या ठिकाणी काही वर्षा अगोदर पर्यंत भेट देणाऱ्यास दिसत असत. ते आजही आहेत. पण आज तिथे लोकसहभागातून एक सुंदर आधुनिक पद्धतीचे मंदिर बांधले आहे. मुख्य देवता माता पार्वती आहे. त्यामागे थोड्या उंचावर देवी रुक्मिणीचे मंदिर देखील बांधले आहे. या ठिकाणाहून ब्रम्हपुत्रेची विशाल धारा दृष्टीस पडते. मंदिर पावसाळा सोडून सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत उघडे असते.
 
या ठिकाणी खोदकामात सापडलेले अवशेष व्यवस्थित प्रदर्शन स्वरूपात मांडून ठेवलेले आहेत. हत्तीच्या अंगावर उभा असलेल्या सिंहाची प्रतिमा येथे बघता येते. काळ्या पाषाणात कोरलेली आणि ऐरावतावर आरूढ झालेल्या इंद्रदेवाची अतिशय सुंदर प्रतिमा येथे आहे, मोरावर आरूढ कार्तिकेय येथे दिसतो. आपले वाहन उंदीर आणि त्यावर आरूढ श्री गणेशाची प्रतिमा येथे आढळते. सूर्यदेवाची प्रतिमा या ठिकाणी आहे. पौराणिक कथेचा संबध असलेले हे मालिनीथान हे ठिकाण निश्चित भेट देण्यासारखे आहे.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.