भाग चौदा : सप्तभगिनींचा प्रमुख आधार, ईशान्य भारताचे प्रवेशद्वार : गुवाहाटी

    14-Jun-2022
Total Views |

guwahati1
(Image Source : Prasad Barve)

 
नागपूर : गुवाहाटी म्हणजे सप्तभगिनीत मोठ्या आणि मुख्य भूमिकेत असलेल्या आसामची राजधानी. ‘लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई’ या गुवाहाटीच्या शानदार विमानतळावर उतरल्यावर आणि तिथून शहरात प्रवेश केल्यावर आपण नवखे आहोत असे कधीही जाणवत नाही इतके भारतीय जीवनशैलीला सुसंगत वाटणारे हे स्थळ आहे.
 
गुवाहाटीत फिरताना आपल्याला अगदी नागपूर म्हणा, पुणे म्हणा अथवा भोपाळमध्ये फिरल्याचा भास होतो. मोठाले गुळगुळीत रस्ते, त्यावर धावणाऱ्या महागड्या चारचाकी गाड्या, माणसांच्या दाटीवाटीने भरलेले रस्ते, उंचचउंच इमारती, चकचकीत शॉपिंग मॉल्स, विविध लोककलेच्या वस्तूंची दुकाने आणि खवय्ये बहादूरांना प्रेमात पडणाऱ्या स्वादिष्ट खानावळी. खरं बघता आधुनिकतेच्या द्रुष्टीने भारताच्या इतर शहरांच्या बरोबरीचे हे महानगर आहे!
 
गुवाहाटीचा शब्दश: अर्थ घ्यायचा झाल्यास...
गुवाहाटीचा शब्दश: अर्थ घ्यायचा झाल्यास गुवा म्हणजे सुपारी तर हाट म्हणजेच बाजार, सुपारीचा बाजार असलेले शहर म्हणजेच गुवाहाटी. आसामात रेल्वेने प्रवेश केल्यास या शब्दाचा अर्थ नक्की आपल्याला पदोपदी जाणवतो. दुतर्फा असलेली नारळ, सुपारी, केळीची झाडे आपल्याला येथील अर्थकारणाचे दर्शन घडवते. गुवाहाटी हे पूर्वांचलातील सगळ्यात मोठे आणि महत्वाचे शहर आहे. IIT, नेशनल लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, विधानसभा, बरासपारा क्रिकेट स्टेडियम, उच्च न्यायालय अशा सर्वमहत्वाच्या आवश्यकता या शहरात पूर्ण होतात. शैक्षणिक, व्यापारी, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिकद्रुष्ट्या मोठे आणि अतिशय महत्वाचे हे शहर.
 
महाभारतकाळातील हे प्रागज्योतीषपूर, राजा नरकासूर आणि त्याचा मुलगा भगदत्त यांच्या राजधानीचे हे शहर. इसवी सनाच्या ७व्या शताब्दीत वर्मन आणि पाल राजवंशाशी हे शहर जोडले गेले. काही शतकांपूर्वीआसामचे अहोम राजे गुवाहाटीच्याही पूर्वेला असलेल्या शिवसागर येथून या प्रदेशाचा कारभार पाहत.
 
 
guwahati2 (Image Source : Prasad Barve)
 
धार्मिक भावना
गुवाहाटी अनेक कारणांनी प्रसिद्ध झाले. यात धर्म मान्यतेला प्रथम स्थान द्यावे लागेल कारण नीलांचलपर्वातावर स्थित मॉ कामाख्या मंदिर येथे आहे. ५१ विश्व प्रसिद्ध शक्तीपीठांतील महत्वाचे स्थळ. माता सतीच्या योनीरुपाचे येथे पूजन होते. भक्त आपल्या मातेचा जयजयकार करीत दर्शन घेतात. आम्बुवांची मेला असाच अद्भुत प्रकार, आषाढ महिन्यात तीन दिवस मंदिर भक्तांसाठी बंद असते. तंत्र मंत्र शक्तींचे पुरश्चरण आदी विशेष पूजा यांचे हे एक केंद्र आहे. दर्शन रांगा आहेत, नि:शुल्क आणि सशुल्क (५००/) दोन्ही प्रकारआहेत. येथे बळी दिले जातात.
 
पौराणिक कथेनुसार शिवपार्वतीचे...
गुवाहाटी शहर कामरूप जिल्ह्यात आहे. एक बाजूला विशाल ब्रम्हपुत्र नदी तर इतर तीन बाजूंस पहाड अशी या शहराची नैसर्गिक वेस आहे. कामाख्या पहाडी जवळच ब्रम्हपुत्रेच्या मध्ये एक उंच पहाड नुमा बेट तयार झाले आहे. पौराणिक कथेनुसार शिवपार्वतीचे मिलन व्हावे यासाठी कामदेव मदनाने ध्यानस्त भोलेनाथांवर कामबाणाचा प्रयोग केला. याने क्रोधीत होवून भगवान शंकरांनी मदनाला आपल्या तेजाने जिथे भस्मसात केले ते हे उमानंद मंदिर क्षेत्र. महाभैरवी कामाख्या मातेच्या आशिर्वादाने कामदेवास पुन्हा जीवनदान मिळाले तेही येथेच आणि म्हणून कामरूप असे नाव या भागाला/जिल्ह्याला मिळाले. येथे ब्रम्हपुत्रानदीचे विशाल पात्र नजरेस पडते. आश्चर्यचकित व्हावे असा प्रचंड जलनिधी. या शांत प्रवाहात चालणाऱ्या मोठ्या नौका आपल्याला ब्रह्मपुत्रेच्या जलौघाचे तसेच आसमिया संस्कृतीचे अनुपम दर्शन करवितात. संध्याकाळी ४ आणि ७ वाजता निघणाऱ्या फेरी बोटीचे तिकीट नक्की काढून या जलपर्यटनाचा आनंद घेतलाच पाहिजे.
 
गुवाहाटी शहरात अनेक महत्वाची स्थळे पाहण्यासारखी आहेत यात चित्रांचल पहाडातील नवग्रह मंदिर हे ज्योतिष विज्ञान आणि खगोलीयपरीक्षण केंद्र आहे. नऊ ग्रहांच्या शिवलिंग प्रतिमा विविध ग्रह दिशांना संबोधित करतात. संध्यांचल पहाडावर स्थित बसिठा किंवा ऋषी वशिष्ट आश्रम हे शिवमंदिर आहे. मान्यतेनुसार ऋषी वसिष्ठांना येथेच मोक्षपद मिळाले. आधुनिक बालाजी मंदिरात आपल्याला तिरुपती बालाजीचे दर्शन होते. उत्तम मंदिर परिसर पाहण्यासारखा आहे. ईशान्य भारतातील विविधता बघायची असेल तर येथील शंकरदेव कला क्षेत्रालाभेट द्यावीच लागेल. पूर्वांचलातील बहुतेक जनजाती, त्यांची जीवन पद्धतीचे मनोहारी दर्शन येथे होते.
 
guwahati3
(Image Source : Prasad Barve)
 
 
भूपेन हजारिका यांची कर्मस्थळी
गुवाहाटी हे प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांची कर्मस्थळी. आपल्या दर्दभऱ्या आवाजाने जगाला मोहित करणाऱ्या भूपेनदा इथे ब्रम्हपुत्रेच्या तीरावर अंतर्मुख व्हायचे. भूपेन हजारिका यांचे स्मृती म्युझियम याच परिसरात आहे. विस्तृत भूभागावर पसरलेले बोटोनिकॅल गार्डन झू हे एकदा तरी बघण्यासारखे आहे. असम स्टेट म्युझियम किंवा प्लानेटोरियम गुवाहाटीच्या पर्यटनाची शोभा अधिक वाढवतात. गुवाहाटी सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या मुंगा सिल्क साड्या, मेखला, सलवार, कुर्ते शर्टसयाबरोबरच पांढरा लाल बोर्डरचा असमिया गमोछां तर भारतभर मोठ्या आवडीने गळ्यात घातलाजातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सुद्धा तो आवडतो. जगप्रसिद्ध चहा मळ्यातूनघेतलेला विविध चवींचा चहा, बांबूच्या अनेक सुंदर वस्तू, काझीरंग्याचे गेंडे,हत्तीच्या लाकडी मूर्ती, जनजातींनी हातमागावर विणलेले विविध सुंदर कोट, गरम शाली, अंग परिधाने, बांबूच्या मोठ्या रंगबिरंगी जापी टोप्या, आसामचे पारंपारिक सुराईतांबुल पानदान, थाळी आदी काशा पितळेच्या वस्तू मिळतील.
 
गुवाहाटीचे खानपान
गुवाहाटीत गेल्यावर काय खायचे हे देखील समजून घेतले पाहिजे. आपण ज्या प्रदेशात जावू तेथिल भोजन तिथल्या चवीनुसार खाण्यात खूप मजा आहे. अगदी शिजवण्याची गरज नसलेला तांदूळ, तांदूळपिठी आणि गुळ घालून केलेला पीठा, चिरा/पोहे गुळासह दही हा नाश्ता तर भोजनात विविधप्रकारचा तांदूळ यात काळा तांदूळ, लाल तांदूळ अर्थात भात आणि भात त्याबरोबरडाळवरण, पालेभाज्या, तळीव वडे, बटाटा वांगे चटणी, बांबूची चटणी आणि हे मोठेइडीलींबू हे शाकाहारी भोजन तृप्त करण्यास पुरेसे आहे. ते नको असल्यासब्रम्हपुत्रेची ताजी मासोळी, बदक, कोंबडी आदी आदी... पण कमी तेल, मसाले वापरून केलेले सामिष भोजनाचा आनंद घ्यायला खवय्ये असण्याची गरज नाही.
 
गुवाहाटीत आलेलापर्यटक येथे जानेवारीत, एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यात तिथे आला असल्यास ‘बिहू’पाहण्याची अंतरीची इच्छा नक्की पूर्ण होणार कारण हा प्रसिद्ध बिहू वर्षातून तीन वेळा साजरा केला जातो. भोगाली, रंगाली आणि कंगाली/काती बिहू अशी त्यांची नावे. जोष, उमंग, उत्साह याचे नाव म्हणजेबिहू, जोशपूर्ण नृत्य, गायन हे यात असते. सुरवातीला संथ असलेला ढोलक, शृंगीयांचा नाद हळूहळू उच्च टिपेला पोचतो आणि यात सहभागी झालेले युवक आणि युवती बेभानहोऊन पण लयबद्ध जोशपूर्ण नृत्ये सादर करतात ती फार नयनरम्य मनोहारी आणि मुद्रा छानफोटोजनीक असतात. ते बघताना आपणही त्या तालावर कधी थिरकायला लागतो ते कळत नाही. शांतीसमृद्धी करिता कृषक परंपरेला अनुसरून हा उत्सव मानवला जातो. आधुनिकता आणि कृषीसांस्कृतिकता, उत्तम कला गुणांचे चाहते असे हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आपलेस्वागत करण्यास उत्सुक आहे.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.