भाग अकरा : खेळाडूंचे राज्य मणिपूरची नवी ओळख

    14-Jun-2022
Total Views |

manipur1
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : भारताचे ‘स्वित्झर्लंड’ काश्मीरला म्हटले जाते, पण ईशान्य भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी स्वित्झर्लंडच्या तोडीस तोड आहेत. पण व्हावी तशी प्रसिद्ध न झाल्याने ती अपरिचित राहिली. मात्र याचा ईशान्य भारताला फायदाच झाला कारण त्यामुळेच अजूनही ताजी टवटवीत आणि आपले नैसर्गिक सौंदर्य टिकवून आहेत. दुसऱ्या अर्थाने सिमेंटची जंगले, वाहनांचे प्रदूषण कमी आहे.
 
मणिपूर हे त्यापैकीच एक राज्य. पूर्वेला ब्रम्हदेश, पश्चिमेला आसाम, उत्तरेला नागालँड तर दक्षिणेला मिझोरम. पहाडांचा विचार केल्यास उत्तरेस नागा टेकड्या, पूर्वेकडे ब्रम्हदेशाच्या वाटेवरील मणिपूर टेकड्या, दक्षिणेला लुशाई टेकड्या. नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले आजूबाजूस पर्वतांनी वेढलेले राजधानीचे इम्फाल, जनसंख्या फार थोडी म्हणजे नागपूरपेक्षा किंचित जास्त बास.... या छोट्या राज्याचे प्राकृतिक द्रुष्ट्या दोन भाग करता येतील.
 
१) राज्याच्या मध्यभागी असलेला मैदानी प्रदेश
२) एकूण राज्याच्या ९० % इतका असलेला त्याभोवतालचा पर्वतमय प्रदेश.
 
ईशान्येतील सर्व राज्यांची नावे त्या त्या प्रदेशाला साजेल अशी आहेत. मणिपूरच्या संबंधात एक कथा सांगितली जाते, एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती भूतलावर फिरत असताना त्यांना ही जागा दिसली. ती जागा त्यांना फार आवडली. ते दोघे नृत्य करत असताना रात्र झाली त्यावेळी सोबत असलेल्या नागराजाने आपल्या मस्तकावरील मण्याने हा प्रदेश प्रकाशित केला. नागमण्याच्या अद्भुत प्रकाशामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तेव्हापासून या प्रदेशाला ‘मणिपूर’ असे नाव प्राप्त झाले.
 
थंड हवामान, उंच हिरव्या-निळ्या टेकड्या, त्यातून वाहणारे पांढरेशुभ्र नदीचे प्रवाह, चोखंदळ रंग संगतीची वस्त्रे परिधान करणारे उत्सवप्रेमी जनजातीय लोक. आपली प्राचीन संस्कृती, परंपरा, उत्सव जपणारे कृष्ण भक्तीत रममाण झालेले मणिपुरी लोक. या राज्याला संपन्न वनप्रदेश लाभला आहे. पाईन, फर, ओक, बांबू, साग, सिंकोना, पाम ही झाडे विपुल प्रमाणांत आढळतात तर जर्दाळू, सफरचंद, नासपती, आलुबुखार ही फळझाडे आपल्या गोड चवीने पर्यटकांचे स्वागत करतात.
 
manipur2(Image Source : Prasad Barve)
 
पहाड म्हटले की, नद्या आल्याच ह्यात इम्फाळ, इरिल, थोबल, नम्बुल, नम्बोल अशा फारश्या मोठ्या नसलेल्या तरीही मुख्य नद्या प्रदेशाला सुजल सुफल बनवतात. काही नद्या उत्तरेतील पर्वतात उगम पाऊन मध्यभागी असलेल्या लोकटक या सरोवराच्या बाजूने जातात. नाम्बोल ही नदी सरोवराला जाऊन मिळते. बराक ही दक्षिण आसामची मुख्य नदी.
 
इथला बहुतांश आर्थिक व्यवहार हा स्त्रियांच्या हातात आहे. व्यापार, दुकाने, खरेदी-विक्री महिलाच करतात. घरात ह्यांडलूम/विणकाम करून वस्त्रे बनवितात. ही पद्धत ईशान्य भारतात सर्वत्र आहे. विवाह होऊन पुरुष सासरी जातो ही पद्धती देखील बऱ्याच जनजातीत आहे उदा. कुकी पुरुष लग्नानंतर वधूच्या घरी जाऊन कुटुंबाच्या कामात हातभार लावतो. ग्रामदेवता लामनाई, उमन्ग्लाई ही वनदेवता, इमुंगलाई ही गृहदेवता आदी देवतांचे पूजन केल्या जाते. पाखेम्बा हा विश्वपिता या नात्याने मुख्य देवता म्हणून पुजला जातो.
 
घोड्यावर बसून खेळला जाणारा पोलो (horse hocky) हा खेळ १४ व्या शतकापासून येथे खेळला जातोय. मात्र युरोपीय देशात तो जास्त लोकप्रिय झाला. मुळात उंची कमी असलेले येथील घोडे /तट्टू हे चपळ आणि ताकदवान आहेत. सन १८५० साली ब्रिटीश सैन्यातील (इस्ट इंडिया कंपनी) काही सैनिक/ अधिकारी चहामळे मालकांसोबत सिलचर भागात फिरत असताना त्यांना काही राजेशाही लोक घोड्यावर बसून हॉकी खेळताना दिसले. सागोल कांगजेई (बांबू काठी) नावाचा हा खेळ, हे नाव आजही उच्चारले जाते. मैतेई उत्सवात हा खेळ खेळला जातो.
 
महिलासुद्धा आता यात मागे नाहीत, अनेक महिला खेळाडूंनी यात नाव कमावले आहे. जेथोलीया थोंगबम, इरोम संगीता, असेम रोमाबाती ही काही प्रसिद्ध महिला खेळाडूंची नावे. ‘Daughters डॉटर्स ऑफ पोलो god’ नावाची एक छोटी फिल्म देखील यावर बनली आहे.
 
हिरव्या मोकळ्या मैदानावर बॉल रुपी नारळाला (झाडाचे न सोललेले, तेल लावलेले) घेवून दोन संघाच्या प्रत्येकी सात खेळाडूंत खेळला जाणारा ‘युबी लिक्पी’ हा खेळ येथे लोकप्रिय आहे. नारळ पळवत समोरच्याच्या गोल पोस्टमध्ये धावत जायचे हा खेळाचा भाग. हा मूळ मणीपुरात खेळला जाणारा, आता रग्बी या नावाने किंवा रग्बीशी मिळताजुळता असा हा खेळ युरोपात प्रसिद्ध आहे.
आपल्या कब्बड्डी सारखा असणारा आणि विशेषतः महिलांचा ‘उलाओबी ’ हा खेळ येथे सुद्धा लोकप्रिय आहे. सात स्त्री देवतांनी आपसात हा खेळ खेळला अशी मान्यता आहे. दोन टीममध्ये हा खेळ खेळला जातो. या बरोबरच नोव्हेंबर महिन्यात होणारी ‘हियांग तन्नबा’ ही बोटिंग रेसची स्पर्धा आहे. प्रत्येकी ४० स्पर्धक एक बोटीवर असतात. जी होडी निर्धारित स्थानी पहिल्यांदा पोचेल ती स्पर्धा जिंकते.
 
या पारंपारिक क्रीडा प्रकारांबरोबरच हॉकी, कुस्ती, तिरंदाजी, फुटबॉल, वेट लिफ्टिंग आणि मेरी कॉममुळे बॉक्सिंग हे येथील आवडीचे खेळ, आता मणिपूरचे नाव भारतात आणि जागात प्रसिद्ध करीत आहेत. मणिपूर हे राज्य म्हणजे खेळाडूंची खाण असे आता सिध्द होत आहे. भारताचे नाव आतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर सुवर्ण, रोप्य आणि कांस्य पदकाने कोरणाऱ्यांच्या यादीत मुख्यतः
 
manipur3
 (Image Source : Prasad Barve)
 
 
सुशीला चानू - महिला हॉकी खेळाडू, भारतीय महिला हॉकी टीमची कप्तान, ब्राजिलच्या रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधत्व केले.
 
कुंजरानी देवी - भारातोल्लन मधील अनेक जागतिक स्पर्धेत ५० पेक्षा जास्त पदके मिळवणारी महिला खेळाडू, अर्जुन पुरस्कार, तसेच क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानित खेळाडू आहे.
 
डिंगको सिंह - मुष्टीयोद्धा, १९९८ च्या ऐशीयाई स्पर्धेत सुवर्ण पदक, अर्जुन पुरस्काराने सन्मानित अनेक युवकांचा प्रेरणा स्रोत.
 
बेमबेम देवी - ‘भारतीय फुटबॉलची दुर्गा’ म्हणून ओळखली जाणारी बेम्बेम देवी हीसुद्धा मणिपूरची. अनेक तरुणीची आदर्श आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात 25 जानेवारीलाच बेमबेम देवीला पद्मश्री जाहीर झाला आहे.
 
नगंगोम बाला देवी - बाला देवीला मग 2005 साली पंधरा वर्षांच्या वयातच भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली.. स्कॉटलंडच्या रेंजर्स फुटबॉल क्लबनं बाला देवीशी करार केल्याचे 29 जानेवरी 2020 रोजी जाहीर केले. या करारामुळे बाला देवी ही जगात कुठेही कुठल्याही टीमशी व्यावसायिक करार करणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ईशान्य भारतातल्या या छोट्याशा राज्याने गेल्या काही वर्षांत भारताला उत्तमोत्तम फुटबॉलर्स दिले आहेत. मणिपूरमध्ये मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
 
बोम्बायला देवी - धनुर्विद्या - २०१६ च्या रियो ओलम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधत्व केले.
 
मेरी कोम - मुष्टियोद्धा - ८ वेळा विश्व बॉक्सिंग स्पर्धेची विजेती, गरीब शेतकरी कुटुंबात जन्म, संघर्ष करत श्रेष्ठ प्रदर्शन, २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार प्र्राप्त, २००६ पद्मश्री, २००९ मध्ये सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जवळ जवळ २० वर्षे या बॉक्सिंग स्पर्धात यशस्वी कामगिरी. जीवनावर आधारित हिंदी चित्रपट
 
कल्पना थोडंम - ज्युदो खेळाडू, २०१४ राष्ट्रमंडल खेळात कास्य पदक विजेता,
 
साइखोम मीराबाई चानू - महिला भारात्तोलक ४८ kg /४९ kg गटात अव्वल, आताच्या टोक्यो ओलम्पिक मध्ये पहिल्याच दिवशी रजत पदक प्राप्त खेळाडू, विश्व चाम्पियानशिप विजेती आहे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. ओलपिंक तयारी करिता तिला आहार नियंत्रण करण्याची गरज होती त्यामुळे आपले आवडते पिज्जा व आईसक्रीम खाणे तिला बंद करावे लागले. पदक जिंकल्यावर तशी इच्छा तिने व्यक्त करताच तिला जीवनभर पिज्जा फुकट देण्याची तयारी एक मोठ्या पिज्जा उत्पादक कंपनीने दर्शवली.
 
आज भारताच्या ऑलंपिक टीममध्ये मणिपूरचे ५ स्पर्धक भारताची शान वाढवत आहे. यात विश्व प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉम, सुशीला चानू (महिला हॉकी), शांग्लाक्पाम नीलकांत (पुरुष हॉकी), मीराबाई चानू (रजत पदक विजेती) आणि सुशीला देवी (जुदो) भारताचे नाव पदक तालिकेत झळकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.
 
फुटबॉल हा मणिपूरचा आवडता खेळ. मुले मुली दोघेही उत्तम फुटबॉल खेळतात. मणिपूर मध्ये खेळाला विरोध केला जात नाही तर याउलट पालक आपल्या पाल्यांना यासाठी प्रोत्साहन देतात. २०१७ मध्ये झालेल्या ‘फिफा’ फुटबालच्या अंडर 17 टीम मध्ये मणिपूर चे ८ खेळाडू होते, यावरून या छोट्या राज्याच्या ताकदीची जिद्दीची कल्पना यावी.
 
खेळ आणि त्याला समर्पित खेळाडू घडवणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे सरकार आणि घरातील पालक यामुळेच मणिपूर आज खऱ्या अर्थाने क्रीडापटूची खाण याअर्थाने ‘मणिपूर’ हे आपले नाव सार्थ करीत आहे.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर 
7276051697
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.