भाग एक : चीन, भूतान आणि ब्रम्हदेशच्या सीमांत प्रदेशापर्यंत घेऊन जाणारा प्रवास

    13-Jun-2022
Total Views |

भाग १
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : चीन, भूतान, म्यानमार या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांना भिडलेलले हे भारताचे पूर्वोत्तर राज्य आणि त्यामुळेच अतिशय संवेदनशील, उंच, कठीण, जंगलांनी व्याप्त आणि कमी लोकसंख्या असलेले हे सीमांत राज्य होय. आपण जसजसे या आंतरराष्ट्रीय सीमा भागांकडे जाऊ तसतसे विरळ लोकवस्ती आपल्याला बघायला मिळते. डोंगराळ रस्ते कसे असतात हे सांगायची गरज नाही. परंतु जिल्हा, तालुका आणि दूरस्थ ग्रामांना जोडणारा रस्ता असणे हे दळवणाचे महत्वाचे साधन. परंतु या डोंगराळ प्रदेशाच्या अंतरंगात आत जाताना रस्ते देखील आपली साथ सोडतात. निर्मनुष्य अन सरळ जंगलातून जाणारी वाट बिकट वाट. रोमहर्षक, थरारक जिवंत प्रसंग यात्रीस येतात. त्यात मुख्य आधार तो बॉर्डर सेक्युरिटी फोर्स, भारतीय लष्कर यांच्या चौक्यांचा!
 
सीमांत समाजजीवन अतिशय कठीण असे ग्राम्य जीवन, मुख्य प्रवाहापासून दूर... अंतराने आणि मानाने सुद्धा. गेल्या कित्येक वर्षांपासून हे अंतर कमी करण्याचे काम अरुणाचल विकास परिषदेने सातत्याने केले आहे. आपल्या अनेक कार्यक्रमातून प्रदेशात एकरस आणि स्नेहमय समाज जीवनात आनंदाचा राष्ट्रभक्तीचा जागर व्हावा या एकमेव प्रेरणेने अरुणाचल विकास परिषद गेल्या ३२-३३ वर्षापासून कार्यरत आहे. श्रद्धा जागरण, संस्कृती, परंपरा कला, भाषा यांना नव संजीवनी देण्याचे काम ही संस्था करते आहे.
 
सीमांत दर्शन यात्रा हा याच प्रयत्नाचा एक भाग आहे. या सर्व आयामांचा समृद्ध करणारा एक अनोखा अनुभव. डोंगराळ आणि जंगलाचा प्रदेश, कित्येक किलोमीटर निर्मनुष्य वन्य प्रदेश, नागरी सुविधांचा अभाव, वीज, रस्ते, संपर्क या अशा सध्या आवश्यक सोयी सुविधांचा प्रचंड अभाव ! पण असे असूनही गेली कित्येक वर्षे सीमांत दर्शन यात्रा हे सातत्याने निघते आहे. दरवर्षी या सीमांत गावापर्यंत, देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या भारतीयाला भेटण्याचा प्रयत्न करते आहे.
 
मुख्यतः चीन, भूतान आणि ब्रम्हदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमांत प्रदेशापर्यंत घेऊन जाणारा असाच एक प्रवास २३ ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला. सीमावर्ती प्रदेशातील लोकांत एकतेची भावना अधिक दृढ व्हावी. आम्ही भारतीय आहोत आणि जगात शक्तिशाली होणाऱ्या भारताचे रहिवासी या नात्याने त्याचा अभिमान बाळगतो. सीमावर्ती प्रदेशातील जनजीवनाचा सखोल बारकाईने अभ्यास करणे. तेथील रहिवाश्यांच्या श्रद्धा आणि संस्कृतीचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोग होतो आहे का, याचा अभ्यास करणे. विदेशी देशांच्या सीमांत हालचाली, त्यांच्या गतीविधीची माहिती सामान्यांपर्यंत पोहचविणे हा सहलीचा मूळ उद्देश होता.
 
इटानगर येथील नादर नामलो मंदिर परिसरातून उपमुख्यमंत्री चौन मेन आणि युवा आणि क्रीडा मंत्री मामा नातुंग यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. मुख्यमंत्र्यांचे सल्लगार ताई तागाक, पोलीस महासंचालक श्री उपाध्ये, आमदार कुंमसी सो उपस्थित होते.
 
अरुणाचल प्रदेशात धर्मांतरण बंदी कायदा १९७८ नुसार लागू झाले आहे. तरीही धर्मांतर करण्यास बंदी असताना ही अनेक बेकायदा मार्गाचा अवलंब करून येथील भोळ्या भाबड्या लोकांना ख्रिश्चन करण्यात आले आहे. येथील मूळ श्रद्धा संस्कृती, परंपरा यांना संरक्षण मिळावे त्यांचा विकास व्हावा या उदेशाने २०१७ रोजी येथील भाजपा सरकारने पहिल्यांदा Indigenous Faiths and Cultural Affairs मंत्रालयाची स्थापना केली. येथील जनजातींचे श्रद्धास्थान असलेल्या दोनी पुलो, अमिक मताइ, नानी इंताया, भगवान रंगफ्रा यांची मंदिरे उभारणे, प्रार्थना सभागृह निर्माण करणे, सामाजिक कार्यक्रम घडवून आणणे, धार्मिक रिती रिवाज करणारे नवे पुजारी बनवण्यासाठी अनेक उपयुक्त कार्यक्रम करणे अशी महत्वाची कामे सरकारी मदतीने सुरु झाली आहेत. तसेच हे मंत्रालय स्थानीय भाषा, लिपी यांचे संशोधन करण्यास मदत करीत आहे.
 
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697 
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.