भाग तीन : भारताचे तिबेट - तवांग

    13-Jun-2022
Total Views |

bhag31
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : सुदूर ईशान्येकडील हे राज्य अनेकानेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. 1962 साली विस्तारवादी बलाढ्य चीनने केलेले आक्रमण याच प्रदेशातून झाले होते. त्यावेळी हा संपूर्ण प्रदेश NEFA (north east frontier agency) या नावाने ओळखला जात असे. पुर्वांचालाकडे नेहरू सरकारने केलेल्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे भारताचा पराभव झाला. अनेक भारतीय सैनिक अपुऱ्या सामुग्रीसह लढले पण तरीसुद्धा प्रचंड पराक्रम गाजवून गेले. शेकडो जवान धारातीर्थी पडले. देशासाठी शहीद झाले. ‘माय हार्ट गोज आउट टू द पिपल्स ऑफ आसाम’ २० नोव्हेंबर १९६२, आकाशवाणीवर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचे हे शब्द आजही इथली जनता विसरली नाही.
 
भारतात जी उत्तम पहाडी सौंदर्य स्थळे आहेत, त्यातील मला आवडलेले ठिकाण म्हणजे तवांग. साधारण १४००० ते १८००० उंचावर वसलेले अत्यंत कमी लोक वस्तीचे आणि बहुतेक वेळा बर्फाने अच्छादलेले सुंदर तवांग. सप्तभगिनी मधील सगळ्यात मोठे राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. पूर्वीचा नेफा २० जानेवारी १९७२ साली नामकरण होऊन अरुणाचल प्रदेश UT (union territory) झाला. नामकरण आणि पहिली अधिकृत राज्याचा दर्जा देखील २० फेब्रुवारी १९८७ मध्ये मिळाला.
 
अरुणाचलात प्रवेश करताना प्रवेश पत्र (ILP) मिळवणे आवश्यक आहे. कारण येथे आसाम अरुणाचलच्या प्रवेश सीमांवर चेकपोस्टमध्ये थांबून आपल्याला जावे लागते. जर हे ILP आपल्याजवळ नसेल तर आत प्रवेश करता येत नाही.
 
ब्रम्हपुत्रेच्या काठाकाठाने गुवाहाटीहून निघाल्यावर आपण दोन-तीन तासात तेजपूरला पोचतो. तेथून सरळ उत्तरेकडे रोख करून आपण अवघ्या ५० किलोमीटरवर असेलल्या भालुकपुंग ह्या अरुणाचलाच्या प्रवेशद्वारी विसावू शकतो, कारण तिथून प्रवास हा उंच चढावाचा असल्याने आपल्या गाडीची गतीही मंद होते. चेक पोस्टवर प्रवेशपत्र तपासून झाले की, आपण ह्या सुंदर प्रदेशात पोचतो.
 
bhag32(Image Source : Prasad Barve) 
 
या भागात राहण्याजोगी मोजकीच हॉटेल्स आहेत. ज्यांना फुरसतीने अरुणाचल पहायचा असेल त्यांनी नक्की येथे मुक्कम करावा. इथे tipi ह्या ठिकाणी एक ओर्चीड बाग आहे. ओर्चीड म्हणजे झाडांवर उगवलेली, त्यांच्याच जीवावर वाढणारी सुंदर रंगीबेरंगी फुलांची छोटी झाडे. येथे अरुणाचलात आपल्याला हे orochids विपुल संख्येने दिसतील. ऑक्टोबर ते जानेवारी अतिशय सुंदर, मनमोहक फुलांची, जाड पानांची, काटेरी पानांची ओर्चीडस आपल्याला सहज दिसतील. अरुणाचलातील पहाडात हे फ्लोरा आणि फॉना ५०० विविध जाती आपले मनमोहायला सिद्ध झालेले दिसतील. हे ओर्चीड उद्यान आणि थोडी खळखळ वाहणारी कामेंग नदी तिच्या किनाऱ्यावर सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्याची मजा बेहतरीन आहे. येथे तुमचा कॅमेरा निघाला नाही तर शपथ हे खात्रीने सांगू शकतो. मोबाईलवर संपर्क होईल की नाही हे सांगता येणार नाही पण फोटो मात्र भरपूर निघतील. हे ढगाने आछाद्लेले पहाड, खळखळून आवाज करणाऱ्या हिरव्या निळ्या नद्या, नागमोडी रस्ते बोमाडीला आणि पुढे तवांगपर्यंत आपली साथ सोडणार नाहीत. येथून फक्त १०० km वर पुढचा मुक्काम आहे पण आपल्या इकडच्या सारखे हे १०० km दिड-दोन तासात संपणार नाहीत हे नक्की ध्यान्यात असू द्या. कशाला घाई करायची, एका बाजूला उंच पहाड तर दुसऱ्या बाजूला प्रंचड खोल खाई... फिरायला आलात ना ? मग येथे पहाडात घाई कसल्याच कामाची नाही.
 
निसर्ग सौंदर्य म्हणतात ते.. ते इथे तुम्हाला हमखास मिळेल हे नक्की. तर हे बोमडिला हे समुद्र सपाटीपासून सुमारे ५००० फुटावर उंच असलेले अतिशय सुंदर ठिकाण. गौतम बुद्धांच्या मार्गावर शांतपणे चालणारी मोनपा जनजाती इथे राहाते. मनाने निर्मळ आणि शांत स्वभावाचे लोक आपले हसतमुखाने स्वागत करतील. सकाळी निघालेले आपण संध्याकाळपर्यंत निश्चिंत मानाने बोमडील्यात पोचतो. गाडीच्या बाहेर पाय ठेवताच थंडीची मजा घेता येते. आतापर्यंत मला काही थंडीबिंडी वाजत नाही म्हणणारे आता डोक्यापासून पायापर्यंत झाकले जातात. वारा देखील थंडगार वाहत असतो. हिटरचा उपयोग इथे हॉटेल्समध्ये करता येतो.
 
सकाळी खिडकी उघडली की, आपणास दूरवर बर्फांनी पहाड दिसू शकतात. मोठ मोठ्या मगात आणलेला तो वाफाळलेला चहा फार वेळ हातात ठेऊ नका बर का... लगेच आटपूनघ्यावे लागते कारण अजून बराच पल्ला गाठायचा असतो. हो... कारण आपल्याला तवांगला जायचे ना ?
 
लवकर निघाल तर लवकर पोचाल. पहाडात रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा कारण केंव्हा काय होईल ते सांगता यायचे नाही. केंव्हा अचानक पाउस पडेल अन landslide होईल किंवा हिमवर्षा होऊन रस्ते बर्फाने झाकले जाऊन पुढेच काय, मागे जाणेही दुभर होईल हे सांगता यायचे नाही.
 
bhag33  (Image Source : Prasad Barve)
 
‘सेला पास’ साधरण १०००० फुटावर आपण पोचतो, उंच पर्वतरांगात वसलेल्या भागात गाढवाल राइफलचे वीर सैनिक सुभेदार जसवंतसिंह रावत यांच्या ‘नूरानांग’ येथील ६२ च्या भीम पराक्रमाच्या गाथा आजही लोककथा बनून जीवंत आहेत. अत्यंत कठीण विषम परिस्थितीत देखील सेला, आणि नूरा या दोन स्थानिक मुलींनी त्यांना केलेली मदत कथारूपाने आजही एकावायास मिळते. चीनी आक्रमणाला येथील स्थानिक जनजाती लोकांनी केलेला विरोध आजही कायम आहे. त्यांची “भारत भक्ती” आजही तेवढीच प्रखर आहे. वीर जसवंतसिंह रावत यांच्या भीम पराक्रमाचे पावन झालेल्या या तीर्थस्थळाला वंदन करून आणि रेजिमेंटने आपुलकीने दिलेला चहा पिऊन मग पुन्हा आपण वर चढण्यास सुरवात करतो.
 
अद्भुत सुंदरता आणि आपण भाग्यवान असाल तर हिमवर्षा काय मस्त चीज असते हे अनुभवास मिळेल. रस्त्यात आपल्यला याक नावाचा, अंगावर काळी लोकरीची शाल ओढलेला आणि आपण लहानपणी पाठ्यपुस्तकात वाचलेला गाय /बैल जातीचा प्राणी भेटतो. आपल्याकडे जशा गायी ,बकऱ्या रस्त्याच्या कडेने चरताना दिसतात तसेच हे याक इथे कडेने दिसतात. या याकच्या दुधापासून चिक बनवून त्याच्या वड्यांच्या माळा आपल्याला रस्त्यावरील दुकानात टांगलेल्या दिसतील. या दुकानातील गावरान मेव्याचा आस्वाद घेतल्याशिवाय आपला प्रवास पूर्ण कसा होणार !
 
तवांगला पोचेपर्यंत सायंकाळ किंवा रात्र ही होऊ शकते. भोजनाचा आस्वाद घेऊन मग हॉटेल मधील दिलेल्या रजया ओढून मस्त ताणून द्या..
 
साधारण २५००० लोक वस्तीचे हे गाव. सकाळी तवांग दर्शन करताना मुख्यतः तीनचार गोष्टी इथे पाहता येतात. इथे गावात प्रवेशताच दुरून आपल्याला एक विशाल बुद्ध मूर्ती दिसते. तवांग मोनेस्ट्री नावाची ३०० वर्षे जुनी आहे. अनेक बुद्ध भिक्कू येथे राहून धर्माचा अभ्यास करतात. इथेच एक सुंदर संग्रहालय आहे. दलाई लामा चीन मधून ह्याच मार्गे भारतात आले होते. तवांगचे वॉर मेमोरियल बघण्यासारखे आहे. ६२ च्या युद्धात शहीद झालेल्या शूर सैनिकांची नावे इथे कोरली आहेत. पेंग टेंग सो हे सुंदर लेक अतिशय नयनरम्य आहे. जर परवानगी मिळाली तर चीन बोर्डरवरील बुमला पासला भेट देता येईल. चढताना दम लागतो. त्यामुळे इथे घाई कामाची नाही.
 
निसर्ग सौंदर्याने डोळे तृप्त होतात हे नक्की. ऑफिसच्या कामाच्या कटकटीतून जरा फ्रेश व्हायचे असेल तर नक्की वेळ काढून अरुणाचलातील तवांग बघितलेच पाहिजे. चला तर मग...!
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697 
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.