भाग सहा : निसर्गदत्त सौंदर्याने बहरलेले माजुली; आसाममधील एक विशाल नदीबेट

    13-Jun-2022
Total Views |

bhag61
(Image Source : Prasad Barve)

 
नागपूर : वैष्णव संस्कृतीचा जगभर प्रचार करणाऱ्या माजुली या निसर्गरम्य परिसराची आज आपण ओळख करून घेऊ. आसामच्या पूर्वेकडील जोरहाट जिल्ह्यापासून अवघ्या २०-२५ किमी अंतरावर असलेला visitors stop अर्थात माजुली नदी बेट. गुवाहाटीला उतरल्यानंतर आपल्याकडे थोडा अवधी असेल तर येथे जाण्यासाठी एखादी चारचाकी आपल्याला सहज मिळू शकते. मुळातच या पहाडी प्रदेशात ड्राईव्ह करताना रस्त्याच्या कडेला ब्रम्हपुत्रेचा प्रवाह पदोपदी आपल्याला साथ देत राहते. उत्तर आसामचा आणि ब्रम्हपुत्रचा पदोपदी दिसून लोकविलक्षण संबंध आपल्याला माजुलीला आल्यानंतरच कळू शकेल.
 
उत्तरेला ब्रम्हपुत्र तर दक्षिणेला दिहिंग अशा दोन नद्यांच्या मधील एक विस्तृत भूखंड म्हणजेच निसर्गदत्त सौन्दर्याचे माजुली बेट. काही शतकांअगोदर मुख्य जमिनीशी जोडला गेलेला परंतु दोन्ही बाजूनी नद्यांनी वेढलेला लांब चिंचोळ्या आकाराचा टापू असलेला हा प्रदेश सोळाव्या शतकाच्या शेवटी भयंकर भूकंप आणि त्यानंतर आलेल्या भीषण पुराने वेगळा झाला. पुढे नद्यांनी आपले मार्ग बदलले आणि आजचे माजोली किंवा माजुली उदयाला आले. नद्यांचा गाळ आणि रेतीमुळे हा टापू अधिक सुपीक होत गेला पण किनाऱ्यापासून त्याची लांबी अधिकच वाढत गेली. तसे पहायला गेले तर या नदी बेटाला जिल्ह्याचा अधिकृत दर्जा देण्याचे कार्य भाजपच्या सर्वानंद सोनवाल यांनी २०१६ मध्ये केले आणि गिनीज बुकात माजुलीची नोंद झाली. माजुली हा आसामचा ३५ वा जिल्हा ठरला. मुख्यमंत्री सोनवाल २०१४ मध्ये ज्या लखीमपुर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व लोकसभेत करायचे तेच सोनवाल २०१६ मध्ये माजुलीहून विधानसभेत निवडून आले आणि आसामचे मुख्यमंत्री झाले.
 
महत्वाचे म्हणजे माजुलीत पोहोचण्यासाठी अद्याप पूल नसल्याने बोटीतून प्रवास करत येथे जावे लागते. दोन मजल्याच्या नौका प्रवाशांसोबत त्यांची चारचाकी वाहने, मिनी बस आणि मोठ्या बसेसची बिनधास्त नेआण करतात. साधारणतः पाउण तासांच्या या प्रवासात माजुलीचे सौन्दर्य आपल्याला दृष्टिक्षेपास पडते. या बेटाची लांबी पूर्व पश्चिम ४५-४८ किमीची असून, उत्तर दक्षिण रुंदी ७-१० किमी इतकी आहे. एकूणच कमीतकमी होत जाणारे एकूण क्षेत्रफळ ४६३ वर्ग किमीचे आहे. या बेटावर साधारण १९० गावे असून, १ लाख ७० हजार लोक राहतात.
 
bhag62 (Image Source : Prasad Barve)
 
आता इतकी मोठी लोकसंख्या आली म्हणजेच गरजा भागविण्याची साधनेही आलीच की, मात्र खरे बघता येथील लोक पूर्णतः आत्मनिर्भर आहेत. स्वतःचे भोजन अर्थात धान/ भात याची मोठ्या प्रमाणात शेती करणारे, सोबतच मक्का, गहू, काळ्या चण्यासोबत गोबी, बटाटे, मुळा, मिरच्या, हिरव्या भाज्या, बीट तसेच फळांमध्ये अननस, नास्पत्ती, उस, केळी पिकवणारे या प्रदेशातील मंडळी आहेत. या बेटावर साधारण चाळीसेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सरकारी आणि गैरसरकारी शाळा आहेत. तसेच ६ ज्युनियर आणि काही सिनिअर कॉलेज आहेत. शिवाय उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी जवळच्या जोरहाट किंवा २५० किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटीत जातात. माजुलीला आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणता येईल. ईशान्येत वैष्णव धर्माचे प्रचारक परम भागवत संत श्री शंकरदेव यांच्या आवडत्या स्थानापैकी एक असलेले हे ठिकाण. येथील... मृदंगाच्या तालावर गोड भजनांमधून झळकणारी हरी बोल हरी बोल ही कृष्णभक्ती ऐकताना आपलेही पाय नकळत थिरककायला लागतात. १५ व्या शतकात श्रीमंत शंकरदेवानी सुरु केलेली ही परंपरा आजही त्याच भक्तिभावाने अविरत सुरू आहे. त्यांचे शिष्य माधवदेव शंकरदेव यांच्यासोबत बेलागुरी या ठिकाणी येथे वास्तव्यास होते. याठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत पण श्रीविष्णू नव्हे तर त्यांचे गरुड वाहन पूजले जाते.
 
आसामच्या या वैष्णवी पूजा स्थळांना नामघर म्हणतात, गर्भगृहात भागवद ग्रंथ किवा छकडा मुरलीधराची मूर्ती असते. नाव अगदी सार्थक, कर्मकांडाचा फाफटपसारा न बाळगणारे केवळ भजन-कीर्तन, नामघोष बस झाले...अर्थात देवाला तरी कुठे काय अधिक हवे असते तो तर नुसतं 'हरी बोल’ या भावफुलांवर संतुष्ट होतो अशी येथील लोकांची भावना. ही अनोखी वैष्णव संस्कृती बघण्यासाठी येथे भारतीय येतातच पण विदेशी पाहुण्यांचीही रीघ लागते. तसेच येथील लोक पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा परिचय पर्यटकांना करून देतात.
 
माजुलीतील कामालाबारी वैष्णव संतांचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम झाले असून, यामाध्यमातून संस्कृतीचा जगभर प्रचार होतो आहे. श्री निरंजन पाठक देव यांनी आउनीआटी सत्राची स्थापना केली. अप्सरा नृत्यासाठी हे सत्र प्रसिद्ध झाले. असमची आभूषणे, हस्तशिल्प याचे दर्शन या नृत्याविष्कारात आपल्याला घडते. जगभरात या सत्राचे सात लाख अनुयायी आहेत. तसेच वनमाली देव यांनी दक्षिणपाट सत्राची स्थापना केली. रासलीला/ रासउत्सव हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी कार्य केले. आज रासलीला आसामचा एक सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे तीन दिवसीय रास उत्सव साजरा केला जातो.
 
bhag63 (Image Source : Prasad Barve)
 
या भागात एक प्रसिद्ध संग्रहालय आहे. या संग्रहालयाला भेट दिल्याशिवाय माजुलीची परिक्रमा पूर्ण होत नाही. लोकविलक्षण गोष्टी, पोशाख, आभूषण, शस्त्र, पुरातन भांडी, हस्तिदंत येथे संग्रहित असून माहितीपूर्ण दालन संग्रहालयाची शान आहे.
 
येथे फिरत असताना मिसिंग जनजातीची वस्ती लागते, देवरी यांची घरे बांबू, नारळाच्या छिलक्यांपासून बनवलेली दिसतील. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती जमिनीपासून पाच ते सहा फुट उंचावर बांधलेली असतात. चढायला एक लाकडी फळी शिडी प्रमाणे ठेवलेली असते. या जनजातीची पोरं, बायका, वृद्ध इतक्या सफाईदारपणे चढ उतरतात की, आपल्या सारखे नवखे गोंधळतात पडतात. या फळीवरून आपण चढायला गेलो तर इतका मोठा माणूस झाला तरीही जमत नाही म्हणून ही पोरं फिदी फिदी दात काढतात. ‘इतना भी नही आता...’ असे त्यांचे एकच वाक्य आपल्याला उमजते. या मिसिंग जनजातीची खासियत म्हणजे ही लोक आपले वस्त्र स्वतः बनवतात आणि घालतात. हॅन्डलूम प्रत्येक घरात दिसेल आणि त्यावर कलाकारी करणाऱ्या महिला. आत्मनिर्भरता शिकावी ती या लोकांपासून कमीत कमी गरजा आणि त्या गरजा स्वतःच्या कष्टाने, स्वतः पूर्ण करतात. म्हणून मोठी शहरे सोडल्यास येथे भिक मागणारे लोक अल्पच दिसतील.
 
माजुलीचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुखवटे बनवण्याची कला काही घरात पूर्वापार चालत आली आहे. रामायणकालीन, महाभारतकालीन, पुराणिक प्रसिद्ध व्यक्तिचित्रे मुखवट्यांच्या रुपात येथे तयार होतात. हे मुखवटे नाटकात मंचन करताना पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. कला, साहित्य व संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल तर आसामच्या या सांस्कृतिक राजधानीला भेट द्यावीच लागेल.
 
येथे तुम्हाला मुंगा रेशीम वस्त्रे मेखला (साडी सारखे) मिळू शकतील, बांबूची सुंदर हस्तशिल्प, मुखवटे तुम्हाला खरेदी करता येतील. आसामात जायचे म्हणजे जरा वेळ काढल्यास उत्तम. कारण येथील लोकजीवन, संस्कृतीचा आनंद एकरूप होऊनच घ्यावा लागतो आणि त्यासाठी जराशी फुरसत काढावी लागते.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697 
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.