भाग सात : चला घेऊया मेघालयच्या सर्वांग सुंदर राजधानीचे दर्शन

    13-Jun-2022
Total Views |

bhag71
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : जागतिक पर्यावरण दिन विशेष : ईशान्य भारतात लोकसंख्या व विशिष्ट जनजातीनुसार छोट्या राज्यांची निर्मिती झाली त्यावेळी नव्याने नावे दिली गेली. अरुणाचल, मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा नावे अत्यंत चपखल, योग्य अर्थाची आणि स्मरणात राहतात. मुख्य भूमिकेत आसाम आणि त्याला वेढून ही छोटी छोटी आपापली वैशिष्ठये सांभाळून ताठ मानेने उभ्या आहेत सप्त भगिनी!
 
भारतात 'शिलॉंग' हे नाव तसे अपरिचित नक्कीच नाही. ब्रिटीशाने अत्यंत मेहनत घेऊन, वेळ, पैसा, मनुष्यबळ खर्च करून बनविलेले शहर. थंड आणि शांत म्हणून ब्रिटीशांचे अत्यंत लाडके राजधानीचे शहर आणि भारत स्वतंत्र झाल्यावर देखील ते भारतीय शासन-प्रशासनाच्या आवडीचे म्हणून सन १९७२ म्हणजे मेघालय स्वतंत्र राज्य होईपर्यंत आसाम-मेघालयाचे संयुक्त राजधानीचे शहर म्हणून मिरवत राहिले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या act east ह्या धोरणाने ईशान्येचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. गुवाहाटीवरून शिलॉंगला जाण्यास पूर्वी ६ - ७ तास सहज लागायचे कारण पहाडी वळणदार आणि ५ हजार फुटावर चढणारे रस्ते कसे असतात हे जाणकार जाणतातच. केंद्रीय मंत्री आणि नागपूरसह साऱ्या देशात रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडकरी साहेबांनी चारपदरी, सहापदरी सुंदर रस्त्यांच्या शृंखलाच येथे तयार केल्या आणि गुवाहाटी ते शिलॉंग हे १०० किमीचे अंतर अवघ्या ३ तासाच्या हाकेवर आणले. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर किंवा गुवाहाटीच्या ‘लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोयी’ विमानतळावर उतरल्यावर थेट शिलॉंगला जाता येते. राष्ट्रीय महामार्ग ४० हा वळणावळणाचा रस्ता, हिरवा निसर्ग, रस्त्यात लागणारी छोटी छोटी गावे, बांबूची छोटी छोटी दुकाने, दुकानात बसलेल्या मालक महिला, विकण्यास मांडून ठेवलेल्या विविध लोणच्यांच्या बाटल्या, अननस, आलु बुखार, केळी, संत्री, हिरव्या भाज्या तर काही दुकानात... लटकलेले रक्ताळलेले मांसाचे तुकडे... असे येथील चित्र.
 
bhag72(Image Source : Prasad Barve) 
 
उंच डोंगरावर वसेलेले हे शहर ब्रिटीश राजवटीत भरभराटीस आले. या शहराचा इतिहास तसा फार जुना म्हणजे १८६४ पासून खऱ्या अर्थाने सुरु होतो. खासी आणि जयंतिया पहाडावर राहणाऱ्या याच नावाच्या जनजातीचे हे केंद्र. १८७४ मध्ये मुख्य आयुक्त प्रांत बनवला गेला, नवे प्रोविन्स त्याचे मुख्यालय हे शिलॉंग झाले. १८२९ ब्रिटिश विरुद्ध बर्मा किंवा ब्रम्हदेश असे युद्ध सुरु झाले, यावेळी इस्ट इंडिया कंपनीत डेविड स्कॉट नावाचा संपूर्ण भागाचा म्हणजे नॉर्थ इस्ट फ़्रंटियरच्या प्रमुख पदावरील व्यक्ती होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांना दक्षिणेत असलेल्या सिल्हट (आज बांगलादेशात ) पर्यंतचा मार्ग ह्याच खासी जयंतिया पहाडातून काढणे वेळ वाचवणारे आणि युद्धनीतीचा भाग म्हणून सोयीचे होते. ब्रिटीशांचा हा प्रस्ताव म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर गदा असा सरळ अर्थ होता. जंगलात राहणारे भोळे खासी आणि जयंतिया या जनजातीचे हे लोक सहज आपला प्रस्ताव स्वीकार करतील अशी ब्रिटीशांची धारणा होती मात्र ती चुकीची ठरली.
 
हळूहळू ब्रिटीश एक एक पाउल आत टाकत होते, चेरापुंजी आजचे सोहरा, शिलॉंग येथे त्याचे जाणे-येणे वाढले, आवागमन वाढले, इंग्लिश वस्ती वाढू लागली. हा रस्ता बनवण्याकरिता खासी तरुणांना जबरदस्तीने कामगार म्हणून राबवणे ब्रिटीशांनी सुरु केले. त्याच्या मागोमाग ख्रिस्चन पादरी येऊन धर्म परिवर्तन करू लागले. आपल्या मातृभूमीवर गोऱ्यांची जुलमी दादागिरी या विरुद्ध खासी राजा तिरोत सिंह याने बंड पुकारले. तीरकमठा, छोट्या तलवारी घेऊन खासी योद्धे इंग्रजांच्या बारूद-बंदुकीचा सामना करू लागले. १८२९ ते १९३३ राजे तिरोत सिंह यांच्या नेतृत्वात सशस्त्र लढा उभारला गेला. परंतु ब्रिटीशांच्या युद्ध निपुण सैन्यापुढे, तटपुंजी संख्याबळ आणि अपुरी शस्त्रे किती काळ टिकणार ? तिरोत सिंह पकडल्या गेले आणि १९३५ ढाका येथे तुरुंगात त्यांचा मृत्यु झाला. शिलॉंग ब्रिटीशांच्या ताब्यात आले...
 
शिलॉंग हे मेघालयच्या राजधानीचे शहर, लोकवस्ती साधारण दिड दोन लाख लोकसंख्या असावी. मेघालयात मातृसत्ताक पद्धती. म्हणजे सर्व महत्वाचे व्यवहार महिलांच्या हाती. संपूर्ण नावाच्या मध्यभागी आईचे नाव. मालकी आईची. शिलॉंगला जाताना उमियम लेक किंवा बडापानी लेक पाहण्यास विसरू नये. हिरव्या डोंगरामध्ये विशाल जलस्त्रोत लाभलेले हे शांत आणि रम्य ठिकाण, येथे विविध प्रकारच्या बोटिंगचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल. मात्र किमान दोन-तीन तास आपल्याला सहज लागतील. सगळा ताण तणाव दूर होईल याची शाश्वती. इथे बर्फ नाही म्हणजे इतके उंच डोंगर नाहीत. पण ५००० फुटावर थंडी ही राहणारच. जून ते सप्टेंबर या काळात मेघांच्या या निवासस्थानी भरपूर पाउस पडतो. पहाडातून पडणारे पाण्याचे प्रवाह धबधबे सुरेख दिसतात किंबहुना प्रचंड पाण्याचा प्रपात घेऊन उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे हेच शिलॉंग किंवा मेघालयचे एक प्रमुख आकर्षण. म्हणून खास पावसाळ्यात दर्दी पर्यटक देशभरातून मेघालयात येत असतात.
 
bhag73 (Image Source : Prasad Barve)
 
शिलॉंगमध्ये प्रवेश करताना इनर लाईन परमिट लागत नाही. नागालेंड, मिझोरम, मणिपूर अरुणाचलात मात्र ILP ची गरज असून, यासाठी आंदोलन सुरु झाले आहे. शिलॉंगचा उद्भूत नजारा आपल्याला शिलॉंग पीक येथून दिसेल. उंच डोंगरावर असलेले हे ठिकाण, यावरून घडणारे राजधानीचे दर्शन सारेच विहंगम म्हणावे लागेल. पुर्वांचलात आपल्या सोबत लेन्स कॅमेरा असल्यास बरे असते. अनेक प्रेक्षणीय स्थळे शिलॉंगच्या अवतीभवती आहेत. स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शंभरावे शहर म्हणून मोदी सरकारने या शहराला निवडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा साधारण ५०० कोटींचा निधी येथे येणार आहे. शहरात प्रवेश करताच अनेक सुंदर आणि जुने चर्चेस आपल्याला दिसतील. दगडी, प्रशस्त बांधकाम असलेले केथेड्रल आहेत. त्यात भन्नाट वारा आपल्याला खरा मोकळा आनंद देईल. लेडी हैदरी पार्क हे फुलांनी सुशोभित उद्यान आहे. ईशान्य भारताच्या सर्व जनजातीची संपूर्ण माहिती, चलचित्र, पुतळे, पेहराव, खानपान, विशेषता, शस्त्र, घरे इत्यादींची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी हवी असल्यास आपल्याला येथील डॉन बॉस्को म्युझियमला भेट द्यावी लागेल. तिकीट साधारण १०० रु प्रती व्यक्ती आहे.
 
एलिफेण्ट फॉल्स हे असेच एक सुंदर धबधब्याचे ठिकाण. खूप दुरून आपल्याला याचा आवाज येतो. दोन तीन टप्यात हा धबधबा पाहता येतो. पायऱ्या उतरत खाली जात आपण थेट पाण्याजवळ पोचतो. अत्यंत रमणीय ठिकाण. गंधकयुक्त पाण्याचे झरे हे या भागात आढळतात. इथे मेघालयात भात हा मुख्य पदार्थ, सोबत डूकराचे मांस आवडीने खाल्ले जाते, मासे हे सुद्धा त्यांच्या भोजनाचा एक भाग. पण घाबरू नका, शाकाहारी पुरी भाजी, पराठे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. ईशान्य भारतात पर्यटन हा व्यवसाय म्हणून मेघालयातील लोकांनी खऱ्या अर्थाने स्विकारला आहे.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.