भाग चार : ईशान्येतील लोकोत्सव

    13-Jun-2022
Total Views |

bhag41
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : ईशान्य भारत! ब्रम्हदेवाने जरा फुरसतीने हा प्रदेश बनविला असावा असे येथे आल्यावर आपल्याला जाणवेल. इतकी निसर्गाची मुक्त उधळण, फुला-पानांची विविधता, विविध सुंदर रंग, दुरून दिसणारी हिमालयाची मनमोहक निळसर हिरवी रांग (bluehills), त्यातून गतीने वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र अवखळ नद्या, सपाट भूमीवर पसरलेली आणि नजर जाईल तिथपर्यंत वाऱ्यावर डोलणारी हिरवी पिवळी भात शेते, नारळ-सुपारीची उंच झाडे, केळी, अननस, संत्री यांचा गोडवा. पहाडातून आलेल्या सियांग, सुबांसिरी, कामेंग आदी उपनद्यांनी मिळून बनलेली विशाल ब्रम्हपुत्रा आणि पहाडातील जनजाती लोकांची आकर्षक लोकनृत्ये!
 
येथील विविध जनजाती ह्या देखील ईशान्य भारताचे एक महत्वाचे अंग आहेत. ह्या विविध जनजातींचे सण-उत्सव हे देखील अनुभवण्यासारखे आहेत. धार्मिक पारंपरिक रितीरिवाज यावरील आस्था-श्रद्धा यांचा संदेश हे उत्सव देतात.
 
ही लोकनृत्ये येथील लोकोत्सवाचा आणि पर्यायाने लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आपले जीवन शांत, समृद्ध आणि सुखी राहण्यासाठी विविध देवतांना हे उत्सव समर्पित केले जातात. त्याचप्रमाणे भूत-प्रेत, मृतात्मा यांना सुद्धा खूष ठेवण्यासाठी ते साजरे केले जातात. यात उचारल्या जाणाऱ्या मंत्रात या भावना दिसतात. अतिवृष्टि नको अन अनावृष्टी देखील नको, समतोल वर्षा व्हावी, आमचे अन्न-धान्य भरपूर पिकावे, आम्हास उत्तम आरोग्य लाभावे यासाठी हे उत्सव साजरे केले जातात.
 
या उत्सवात अनेक लोकगीते, लोकनृत्य यांचा समावेश असतो, किंबहुना या शिवाय या उत्सवांना पूर्तता येत नाही. येथील लोकगीतातून अनेक कथा, दंतकथा, उत्पत्ती कथा, पृथ्वी पासून ते मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्या उत्त्पतीच्या कथा, पूर्वजांचे देशांतर गमन, मूळ पुरुष यांच्या अनेक कथा, परंपरा, रितीभाती यांचा बोध होतो. शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी आणि केल्यानंतर केलेल्या नृत्यातून हर्ष-आनंद, उत्साह यांचे प्रगटीकरण होते. आजपर्यंत केवळ मौखिक पाठांतरातून ही लोकगीते, उत्सव आणि पूजा पद्धती पुढील पिढ्यात हस्तांतरित केले गेले आहेत.
 
 
अनेक नव्या पर्वाच्या प्रारंभी, शुभ प्रसंगात हे उत्सव साजरे होतात, बहुतेक प्रसंगी हे सर्व समाजाचे असतात. संपूर्ण गाव याप्रसंगी एकत्रित आले असते. एकत्रित पूजा, समूह नृत्य, पशुबली आणि त्यानंतर सामुहिक भोजन असे याचे स्वरूप असते.
 
मेघालयात खासी आणि जयंतिया आणि गारो या प्रमुख जनजाती आहेत. मान्सूनचे स्वागत करण्याकरिता तसेच रोपणी व्यवस्थित व्हावी, अतिवर्षा पण नको, रोपणी प्रसंगी अति वारा नको, ती सुखकारक व्हावी याची मागणी करणारा आणि मागील वर्षी उत्तम पिकलेल्या धन-धान्यासाठी देवाचे आभार मानणारा हा ‘शाद सुक मिन्सियम’ नावाचा हर्ष उल्हास आनंदाचा उत्सव खासी जनजातीत साजरा होतो. पुरुषांच्या पगड्या फार सुंदर असतात, पगडी त्यात खोचलेले विशिष्ट तुरे, महिलांच्या डोक्यावर धातूचे मुकुट, अंगात भरगच्च पिवळ्या माळा, अंगावर शाल अत्यंत सुंदर असं रेखाचित्र मनाला आनंद देऊन जातं.
 
नागालँड मधील जेमी, जेलीयांग इ. जनजाती पुरुष आणि महिला दोघेही एकसाथ नृत्य करत साजरा करतात. आकर्षक पोशाख हे या नागभूमिचे वैशिष्ट्य. गीत आणि नृत्यात काही ठिकाणी आक्रमकता बघायला मिळते. युद्ध प्रसंगी, वीर हास्य किंवा रुदन अशा प्रकारचे भाव व्यक्त होतात.
 
bhag42 (Image Source : Prasad Barve)
 
आसाम मधील बिहू हा उत्सव म्हणजे आनंद, उल्हास यांची नुसती बहार असते. वर्षातून ३ वेळा वेगवेळ्या नावाने हा बिहू साजरा जातो. पिवळ्या मुंगासिल्कच्या साड्या घातलेल्या आणि कमरेवर पालथे हाथ ठेवून आपल्या प्रियकराला साद घालणाऱ्या सुंदर तरुणी आणि शुभ्र पांढरी वस्त्रे आणि लाल पांढरा आसामी गमछां कमरेला, डोक्याला गुंडाळलेले उत्साही तरुण. त्याला ढोलक, शृंगी यांची सुंदर लयबद्ध साथ आणि तरुणाईची बहारदार गीते म्हणजे बिहू. खा, प्या आणि मौज करा म्हणजे बिहू!
 
ईशान्येतील हे उत्सव ही लोकनृत्य हे जीवनातील उत्साह आणि आनंदाचे प्रतिक आहेत. आनंद, प्रेम, कृतज्ञता आदी भाव-भावनांचे वैविध्यपूर्ण आणि तितकेच मनोहारी चित्रण म्हणजे हे उत्सव. या प्रसंगी नवे उत्तम पोशाख, हातातील कानातील आभूषणे, गळ्यातील वेगवेगळ्या माळा, डोक्यावरील सुंदर टोप्या यांचे एक सुंदर चित्र समोर उभे राहते. पुरुषांचे हातातील सजवलेले रंगीत भाले, तलवारी, वेताच्या ढाली, अंगातील कोट नुमा अंगरखा यामुळे ही नृत्ये खूप आकर्षक आणि सुंदर वाटतात. यातील नृत्यशैली जरी साधी असली तरी याला मिळालेली सामुहीकतेची जोड मनाला सुखावून जाते.
 
यात पुरुष गीताची अर्धी अर्धी ओळ सांगतो त्याला बाकी नृत्य करणाऱ्या महिला साथ देत मागून म्हणतात. ऐकताना एखादी कथा सांगितली जाते, एखादे कथानक उलगडले जाते आहे असे ऐकणारयास वाटते. हा लीडर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पायाचे पदलालित्य दाखवत नाचत असतो.
 
bhag43 (Image Source : Prasad Barve)
 
अरुणाचलातील जनजातीमधील आदी, गालो यांचा मोपीन, सोलुंग, निशी जनजातीचा- न्योकुम, अपातानी-ड्री, तागीन जनाजातीचा-सी दोन्यी, मोनपा लोकांचा - लोसार, इदू मिशमींचा रेह इ. विशेषत्वाने म्हणता येतील. लोसार हा बौद्धवर्गीय मोनपा जनजातीचा एक असाच अनोखा उत्सव. यात मास्क डान्स, मुखवटा नृत्य हे प्रसिद्ध आहे. देवता आणि राक्षस यांचे मुखवटे घालून नृत्य केले जाते. यात याक, ड्रगन यांचे पोशाख करून नृत्य केले जातात. दिगारू मिशमी जनजातीचा ताम्लाडू हा उत्सव मुख्यतः नैसर्गिक आपदेतून सुरक्षा देण्याकरिता जल आणि पृथ्वी देवतेला प्रार्थना म्हणली जाते. मार्च महिन्यात येणारा हा सण, नववर्षाची सूचना देणारा आहे.
 
निसर्ग, जंगल पशु पक्षी प्राणी यांचे संबंधातील कथा रोचक आहेत. या पहाडी जनजाती लोकांचे हे उत्सव त्यांच्या निर्दोष, निष्कपटी आणि सरळ मनाला आनंद देणारे आहेत.
 
अरुणाचलातील आदी गालो जनजातीचा एक महत्वपूर्ण उत्सव म्हणजे मोपीन. एप्रिल महिन्यात येणारा हा सण पाच दिवस चालतो. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. नैसर्गिक आपदा, रोग, दुष्टआत्मे याच्या प्रभाव नष्ट होऊन सुख-समृद्धी घरात येवो, नवा वंश अंकुरो, याकरिता मोपीन देवतेची प्रार्थना केली जाते. यावेळी महिला स्वतः विणलेले लुंगीसारखे गालुक वस्त्र आणि गळ्यात लाल-पिवळ्या मुंगाच्या माळा घालतात, डोक्यावर बांबूचा सुरेख मुकुट असतो, सुंदर आभूषणे घालून ‘पोपिर’ नृत्य करतात. या उत्सवाची विशेषतः म्हणजे मिथुन नावाच्या बैल/रेडा बळी दिला जातो. आणि आहाराचा अविभाज्य भाग असेलेले तांदुळाचे पीठ ओले करून ते एकमेकांना लावले जाते, आपण होळीला रंगपंचमीला लावतो तसे...!
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697 

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.