भाग पाच : ब्रह्म पुत्र

    13-Jun-2022
Total Views |

bhag51 (Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : Brahmaputra River : गुवाहाटीत उतरल्याबरोबर आपल्याला दर्शन होते ते एका प्रचंड मोठ्या जल प्रवाहाचे ! जसे कोलकोता हे मां गंगेच्या किनारी वसलेले मोठे शहर तसेच आसामचे आणि ईशान्येचे प्रवेशद्वार असलेले गुवाहाटी हे ह्या मोठ्या जलप्रवाहाच्या नदीच्या किनाऱ्या वसलेले एक मोठे शहर! नदी हा तसा स्त्रीलिंगी शब्द, भारतातील आणि जगभरातील नद्यांची नावे ही याच स्त्रीलिंगी स्वरूपात आहेत. पण इथे मात्र तो ‘नद’ आहे आणि तो म्हणजे ब्रम्हपुत्र ! याचे कारण शोधता एक नवी आणि रोचक माहिती समोर येते.
 
आपल्या पुराणात महाभारत आदी ग्रंथात ईशान्य भारताचा आणि त्याच बरोबर ब्रम्हपुत्र चा उल्लेख आढळतो. ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना केली. पहिली मानव उत्पती कुठे झाली असे बघताना आपल्याला मेरू पर्वतावर असलेल्या वातावरणात झाली असे म्हंटले आहे.
 
''परिमण्डलेर्मध्ये मेरुरुत्तम पर्वतः। ततः सर्वः समुत्पन्ना वृत्तयो द्विजसत्तमः।।
हिमालयाधरनोऽम ख्यातो लोकेषु पावकः। अर्धयोजन विस्तारः पंच योजन मायतः।।''
 
चरक संहितेच्या वरील सुक्तानुसार मेरू पर्वातावर स्थित अर्धे योजन चार मैल रुंद आणि पाच योजन म्हजे चाळीस मैल लांब अशा या तिबेटच्या भागात आदिमानवाची उत्पत्ती झाली. त्रिविष्टप किंवा तिबेट हेच ते मानव निर्मितीचे पहिले स्थान. आदिमानवाने जन्म घेतला ते हे ठिकाण. महर्षी दयानंदाच्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात सृष्टी रचना ही त्रिविष्टप म्हजेच तिबेट येथे झाली असा उल्लेख आहे. महाभारतात देखील देविका नदीच्या पश्चिम तिरावर मानव जीवन प्रारंभ झाले असा उल्लेख आहे. ह्याच तिबेट मध्ये ऐरावती, वितस्ता, विशाला, आदी नद्यांच्या उल्लेख आढळतो. दक्षिण पश्चिम अंतरावर असलेले ‘मानस’ हे दिव्य सरोवर. ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना इथेच केली. त्यामुळे पहिला मानव हा ब्रम्हपुत्र ठरला आणि कदाचीत या मुळेच याच ठीकाणाहून निघणारा जलप्रवाह ब्रम्हदेवाचा पुत्र याआर्थाने ब्रम्हा पुत्र असे नाम झाले आणि हा प्रवाह ब्रम्हपुत्र या नावाने जगप्रसिद्ध झाला.
 
bhag52 (Image Source : Prasad Barve)
 
ब्रम्हपुत्रचे उगम स्थान हे इथे तिबेटात १७००० हजार फुट उंचावरील अंगासी ग्लेशियर किंवा आंगासी हिमनद म्हणूया. पवित्र मानस सरोवराजवळ असलेल्या बुरांग या ठिकाणी स्थित आहे. तिबेटात ब्रम्हपुत्र अधिक का रमला हे कळत नाही. जवळ जवळ १२९० km चा प्रवास इथे तिबेट-चीन याच भागात होतो, चीन मध्ये या लू त्सांग पू चियांग या नावाने ओळखला जातो. आपल्या मुळस्थानापासून पूर्वेकडे हा प्रवाह वळतो नंतर थोडे उत्तरेकडे प्रवास करून पश्चिमेकडे धाव घेत सरळ दक्षिणेकडे वळतो, या दरम्यान अनेक नद्या, उपनद्या यास मिळत जातात यात मुख्यतः तिस्ता, मानस, तोरसा, कामेंग, सुबांसिरी, सियांग, दिबांग, लोहित या अनुक्रमे सिक्कीम, बंगाल, भूतान आणि अरुणाचलातील पहाडी नद्या म्हणता येतील. अरुणाचल-आसाम मधून नैऋत्येस वाहत बंगलादेशात तो येतो, तो आपले विस्तीर्ण पात्र घेऊन येथे मात्र ‘तो’ चा ‘ती’ होते आणि जमुना या नावाने ओळखल्या जातो. तिथे गंगेची उपनदी पद्मा त्याला भेटते पुढे या दोघी मेघना या संयुक्त नावाने ओळखले जातात.
 
त्यामुळे अधिकाधिक जलाने पुष्ट होत हा पूर्वेकडे वळत उतावीळ होऊन बंगालच्या सागरास मिळतो. सुंदरबन, गंगेने बनवलेला त्रिभुज प्रदेश साधारण याच ठिकाणी ब्रम्हपुत्र देखील सागरास मिळतो. या ब्रम्हपुत्राचा भारतातील प्रवास फक्त ७२५ km येवढाच तर बांगलादेशात त्याचा प्रवास साधारण ३७० km एवढाच होतो. अरुणाचलातील पूर्वेकडे असेलला लोहित जिल्हा एक विशेष पौराणिक कथेशी निगडीत आहे ती म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार भार्गव परशुरामाने पृथ्वीस नि:क्षत्रिय केल्या नंतर रक्तरंजित झालेला आपला परशु याच ठिकाणी धुतला. परशुरामकुंड या नावाने अजूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे व मकरसंक्रातीला येथे मोठी यात्रा भरते. रक्ताने लाल झालेला म्हणून लोहित अशी आख्यायिका आहे. कालिदासाच्या रघुवंशात देखील ‘लोहित्या’ असा उल्लेख आढळतो.
 
जसे ईशान्य भारत हा सप्तभगिनीचा मिळून बनतो पण या सप्तभगिनींना देखील या ब्रम्ह पुत्राशिवाय पूर्णता येऊ शकत नाही. ब्रम्हपुत्र या पूर्वोत्तर भागाची संस्कृती आहे, सभ्यता आहे आणि अस्मिता देखील आहे . ब्रम्हपुत्र मंगोल आहे , तिबेटीयन आहे , अहोम आहे मुगल आहे तसाच तो आर्य आणि अनार्य देखील आहे. या सगळ्या सभ्यतेचा एक विलक्षण दर्शक आणि म्हणून वेगळा अनुभव म्हणजे ब्रम्हपुत्र ! कित्येक संस्कृती, सभ्यता, सत्ता, राजे, राज्ये इथे वसली, आपसात झगडली आणि बिघडली सुद्धा. ब्रम्हपुत्र इथल्या लोक कथांमध्ये, लोकगीतांमध्ये आणि लोकआस्थांत प्रवाहित आहे.
 
इथली प्राकृतिक सौंदर्य स्थळे, विशाल नदी बेट असलेले माजुली, उमानंद सारखी बेटे हे निसर्गाचे उद्भूत देणे म्हणून पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. ब्रम्हपुत्र चे साह्याने इथेली जनजातीय संस्कृती बहरली. ह्या प्रवाहात त्यांना त्यांचे रोजगार , उत्पनाचे साधन मिळते. ब्रम्हपुत्र त्यांच्या साठी भगवंताचे देणे तर आहे पण बुढा लुईत म्हणजे जेष्ठ रक्तवर्णीय पुण्यपुरुष सुद्धा आहे. ब्रम्हपुत्र हे पापनाशिनी म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या प्रवाहात लाखो करोडो जीवजंतू, वनस्पती, दगड, माती, खनिजे, वायु, प्रकाश आदी सारी प्राकृतिक शक्ती मिश्रित होत जातात. पापनाशन करणारे जलस्त्रोत या मुळेच तर स्वच्छ, सुंदर, अकृत्रिम असेच राहावे जेणेकरून ते विज्ञानाच्या भाषेत किंवा अध्यात्मिक भाषेत पापविनाशक म्हणून प्रसिद्ध होतात.
 
bhag53(Image Source : Prasad Barve) 
 
काही विशेषता या प्रवाहा बाबत आहेत त्या म्हणजे उंचावर दीर्घ प्रवास करणारा असा हा जलप्रवाह, तीव्र गतीने वाहणारा जलप्रवाह विशेष करून पूर असतानाचा सगळ्यात जास्त वेग असणारा . एक शिंगी गेंड्यांचे आश्रयस्थळ काझीरंगा याच ब्रम्हपुत्रेच्या तीरावर वसले आहे. जगातील सगळ्यात मोठे नदी बेट माजुली हे याच ब्रम्हपुत्रने वेढल्याने तयार झाले आहे. काही ठिकाणी याची रुंदी १५-१८ km इतकी विशाल आहे यामुळे काही ठिकाणी त्याला बघणे म्हणजे समुद्राच्या विशालतेचा अनुभव घेणे होते . खोली १२५ ते ३५० फुट इतकी असून लांबी मोजू जाता २९०० km लांबीचा जल प्रवाह म्हणजे ब्रम्हपुत्र!
 
आसामातील बहुतेक सर्व मुख्य शहरे याच काठावर वसली आहेत. दिब्रुगढ, जोरहाट, धुबरी, तेजपुर, गुवाहाटी आणि बांगलादेशात सिराजगंज, मेमेनसिंग. पावसाळ्यात होणाऱ्या भीषण पूराने लाखो लोक दरवर्षी बेघर होताना आपण बघतो. मनुष्यच काय पण प्राणी पक्षी यांच्या करिता देखील हा पूर, हा प्रचंड जल आवेग नकोसा होतो. पण बाकी आठ महिने हा ब्रम्हपुत्र तिबेट, नेपाल, भूतान, अरुणाचल, आसाम आणि बांगलादेशासाठी जीवनदायी, रोजगार देणारा, संस्कृती आणि सभ्यतेचा मार्गदर्शक असाच आहे. आसामचे प्रसिद्ध गायक भारत रत्न भूपेन हजारिका यांनी कैक गाणी याच विशाल ब्रम्हपुत्रच्या पात्रात संथ गतीने नाव हाकताना म्हटलेली आजही प्रसिद्ध आहेत...
 
हे महाबाहू ब्रम्ह पुत्र,
वसंत आपणहून येईल काय ?
हे ब्रम्ह्पुत्र, तुझ्याच किनारयावर
ही विशाल समृद्ध संस्कुती विस्तारली
तुझ्याच किनाऱ्यावर महान संत शंकरदेव प्रगटले
तुझ्याच किनारी लाचीतने शत्रूस सराइघाटचे पाणी पाजले
पर्शियावरून अजान फकीर आले, गुर तेगबहादूरांनी मानवतेचा पुल बांधला
हे महाबाहू ब्रम्ह पुत्र तू महान आहेस, तू धन्य आहेस ||
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697 
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.