भाग आठ : रम्य मेघालय अर्थात पावसाचेच घर

    13-Jun-2022
Total Views |

bhag81
(Image Source : Prasad Barve)
 
नागपूर : अनेक अर्थाने सुंदर आणि अद्भुत गोष्टींचा खजिना म्हणजे मेघालय. मातृसत्ताकपद्धती मेघालयाची जीवनशैली, येथील लोकोत्सव, लोकगीते आणि लोकनृत्यांच्या माध्यमातून मेघालयाने आपले वेगळे पण जोपासले. पोम्ब्लांग नोंग्क्रेम, वांगला, बेहादिन्ख्लाम अशी येथील उत्सवांची नावे.एप्रिल-मे, जुलाई, जानेवारी या महिन्यातविविध उत्सव येतात. ‘शाद सुक माय्न्सीम’ हा वसंत उत्सव... जीवनाच्या आनंदाच्याक्षणी समूह्नाने एकत्रित येऊन साजरा केलेले सण-उत्सव हे कटुता संपवून जीवनात आनंदआणि शांती निर्माण करतात यात शंका नाही.
 
मेघालयाची राजधानी शिलॉंग हे तसे मोठे आणि समृद्ध शहर. शहरी गजबजाट, कोलाहल, वर्दळ, अरुंद रस्ते त्यात लहान मोठ्या गाड्या बसेसची भर, चौकात उभे पोलीस, आकर्षक वस्तू, कपडे, दुकानातील दिव्यांचा झगमगाट, इल्क्ट्रोनिकची दुकाने, मोबईल शॉपी, काचेच्या भिंतीआड आपले वैभव दाखवणारे आकर्षक मॉल्स आणि उत्तम मनोवेधक पद्धतीने मांडलेली मिठाईची दुकाने, पाटी पाहताच भूक लागणारी रेस्टॉरंट एकना अनेक... भरगच्च असा शहरी माहोल!
 
इथे हॉटेलच्या बाल्कनीत अथवा खिडकीतून बाहेर डोकावल्यास प्रवासाचा थकवा चटकन निघून जातो. संपूर्ण ईशान्येत वेगळे ठरलेले मेघालय अनेक अर्थाने अद्भुत आहे. निसर्गाने इथे आपली कला अधिकच खुलवून आणली असे मेघालयात फिरणाऱ्या कोणालाही पटेल आणि ही श्रीमंती अनुभवायची असेल तर सकाळी जितक्या लवकर आपण शिलॉंगच्याबाहेर पडू तितके चांगले म्हणजे अगदी सहा-सात वाजेपर्यंत...!
 
मेघालायाचा ग्राम्य भाग हा अधिक सुंदर, अधिक सुखावह आणि अधिक फोटोजनीक आहे. हिरव्या डोंगरातील नागमोडी वळणे, मध्येच लागणाऱ्या पावसाच्या सरी त्यामुळे थंड आणि ओलसर झालेले वातावरण, ओले डांबरी रस्ते, तरंगणारे पांढरे-काळे ढग आणि निळे आकाश, सूर्यदेवाचे दर्शन झाले तर अलभ्य लाभ समजावा... अशा मस्त वातावरणात आपण बाहेर पडतो, ड्राईव्हरला फर्माईश करून पेनड्राईववर किशोर कुमारची भन्नाट गाणी सुरु होतात आणि मग कारची खिडकी खालीकरून, बाहरे डोके काढून नकळत आपलाही राजेश खन्ना किंवा संजीव कुमार होऊन जातो...! घेता येईल तेवढा निसर्ग टिपून घ्या... डोळ्याने... श्वासाने... मनाने... just go on...
 
bhag82 (Image Source : Prasad Barve)
 
मेघालय फिरताना रस्त्याच्या कडेला काही दगडी रचना नजरेस पडतात, यांना मोनोलिथ म्हणतात. साधारण ५ ते ७ फुट उभे असलेले दोन / तीन दगड आपल्याला स्मृती चिन्ह बनून प्रवासाचा मार्ग दाखवतात. खाली आडवा पडलेला दगड, फुटपाथ मोनोलिथ किंवा स्त्री मार्गदर्शक म्हणता येईल. मेघालय, अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. यात पहिले आहे ते जलप्रपात किंवा विशाल धबधबे. शिलॉंगच्या अगदी जवळ असलेला एलिफंटा फॉल्स. शिलॉंगहून चेरापुंजीला जाताना पाण्याच्या उगमापर्यंत म्हणजे अगदी teble top जाता येणारा अतिशय सुंदर असा डेन्थलिन वाटरफॉल, उंच नोह्कलीकाई वाटरफॉल, लांगशियांग वाटर फॉल, उंचावर पडणाऱ्या सात वेगळ्या जलधारांमुळे ‘सेव्हन सिस्टर’ या नावाने प्रसिद्ध झालेला हा धबधबा विलक्षण आनंद देतो. तसेच अनोखा असलेला स्वीट वाटरफॉल बघायला मिळतो. अशी अनेक सुंदर नावे येथील धबधब्याना पडली आहेत.

गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालली बळे
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे ||
 
हे समर्थ वचन, शिवथरघळ परिसराचा अनुभव आपल्याला इथे येतो, कानावर पडणारा पाण्याचा खळखळ आवाज आणि अलगद अंगावर पडणाऱ्या जलधारा मनाला वेगळीच प्रसन्नता देतात. मेघालयात अनेक नैसर्गिक गुहा आहेत, यात चेरापुंजी (सोहरा) जवळ असलेली ‘मौसमाई केव्ह’ फार सुंदर आहे. लाईमस्टोन चुनखडी दगडांचे ओबडधोबड पण गूढ वाटणारे, जणू कोणीतरी कोरले आहेत असे वाटते. पाण्याच्या जलधारांनी ते काही ठिकाणी टोकदार झालेले दिसतात. पांढरे-काळे विविध विक्षिप्त आकाराच्या दगडातून वाट काढताना आपल्याला कधी वाकावे लागते तर कधी अक्षरश: रांगावे लागते. आत कुठे लक्ख उजेड तर कुठे काळभोर अंधार... आणि त्याचमुळे मोबाईलच्या प्रकाशात खाली ओलसर घसरड्या ओबडधोबड चिंचोळ्या वाटेतून गुहा पार करणे हा एक अस्सल थरार आहे. मेघालयात जवळ जवळ ५०० वालुका किंवा चुनखडी दगडाच्या गुहा आहेत. त्यामुळे गुंफा भ्रमणाचा आनंद आपण घेऊ शकतो. येथे धबधबे विपुल आहेत. ‘उमियम लेक’ सारखे सुंदर आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असे मोठे जलाशय आहेत. येथे क्रुज बोट, पैडल बोट यातून जलविहाराचा मनसोक्त आनंद लुटता येतो. रॉकक्लाइम्बिग, ट्रेकिंग, जंगल भ्रमंती हाच मेघालायाच्या उत्पन्नाचा आगळावेगळा स्त्रोत आहे.
 
शिलॉंग पासून अवघ्या २५-३० किलोमीटर अंतरावर ‘मावफ्लोंग’या नावाने घनदाट जंगल आहे. या जंगलात ‘ला बासा’ या वन देवतेचे वास्तव्य असल्याची मान्यता असून, वृक्ष, जंगल आणि निसर्गाला मानणारे लोक हेच प्रकृती रक्षणाची जबाबदारी निभावत आहेत. या पवित्रवनात रुद्राक्षाची झाडे आहेत. मेघालय आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे लिविंग रूट ब्रिज (जीवित जड सेतू). अर्थात मानवाने निसर्गाच्या साधनांचा उपयोग करीत बनवलेला नदीवरील नैसर्गिक सेतू. येथे रबराचीझाडे भरपूर आहेत. या रबरी झाडांच्या मुळ्या किंवा पारंब्या यांना नीट व्यवस्थित लांब बांबूवर बांधून त्याची वाढ केली जाते. नदीच्या दोन्ही कडील पात्रात उभ्या रबराच्या ह्या पारंब्या एकमेकांत गुंफवल्या जाऊन एक पूल तयार होतो. पण याला बनायला १५ एक वर्षे सहज लागतात. अशी ही झाडे अन हे पूल ५०० वर्षे टिकतात. चेरापुंजी जवळ असलेला डबल डेकर ब्रिज विश्व प्रसिद्ध आहे.
 
bhag83
 (Image Source : Prasad Barve)
 
मोवेनलोंग येथे जयंतिया हिल्स मधील रांग्था इल्लाइंग ह्या ठिकाणी हे रबराचे अद्भुत पूल ग्रामस्थांचे आवागमन सुखकर करतात. पर्यटक तर हा अद्भुत पूल पार करताना अविस्मरणीय अनंदाचा लाभ घेतात. चेरापुंजी हे जगात सर्वात जास्त पाउस पडणारे नंबर एकचे ठिकाण होते. आता खासी हिल्समधील आणि शिलॉंगपासून साधारण ६० km दूर असलेले मौसिंराम हे सर्वात जास्त पाउस पडणारे नंबर एकचे ठिकाण झाले आहे. जगात सगळ्यात जास्त ११ हजार ८७२ mm वार्षिक पाउस येथे पडतो अशी नोंद आहे. हे ठिकाण चेरापुंजी पासून केवळ १५-२० km दूर आहे. मौसिंराम येथे जवळ्च जक्रेम येथे गरम पाण्याचे झरे आहेत. येथील पाण्यात काही औषधीय गुण आहेत असे येथील लोक सांगतात.
 
मेघालयचे नाव प्रसिद्धीस आले ते ‘मावलीनॉंग’ ह्या आशियातील सर्वात स्वच्छ गावामुळे. गावकऱ्यांची अनोखी स्वच्छता पाहण्यासाठी येथे जगातून लोक येऊ लागले आहेत. त्यामुळे हे गाव आता एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. येथले ट्री हाउस बघण्यासारखे आहे. स्थानिक आदरातिथ्याचा एक वेगळा आनंद घेता येईल. पश्चिमी जयंतिया हिल्स जिल्ह्यातील ‘डाउकी’ हे बांगलादेश सीमेवर असलेले आणखी एक प्रसिद्ध ठिकाण. उमंगोट ही नदी येवढी स्वच्छ आहे की, यातून विहार करताना नदीचा तळ आपल्याला स्पष्टपणे दिसतो. इतके नितळ, पारदर्शक पाणी येथे दिसते. आजूबाजूला हिरवे डोंगर आणि मध्ये संथ वाहणारी हिरवी नदी आपल्याला एक निखळ आनंद देऊन जाईल. येथे घालवलेला एखाद तास अद्भुत आणि विलक्षण अनुभव देईल यात शंका नाही. ‘रंगीत नाव’ उत्सव हा येथे हिवाळ्यात होणारा कार्यक्रम पर्यटकांना आकर्षित करतो. ‘तुरा’ हे गारो पहाडातील एक महत्वाचे शहर येथे ‘नोकोरेक’ नावाचे एक उत्तम राष्ट्रीय उद्यान आहे.
 
खासी जयंतिया आणि गारो या पहाड श्रुखंलांनी मेघालय पूर्ण होतो. याच नावाच्या जनजाती येथे आपापले वैशिष्ट्य जपून आहेत. तरी ख्रिचन धर्माची पूजा पद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. वर बघितलेल्या प्रसिद्ध गोष्टींनी मेघालयाचे नाव भारतात आणि भारताबाहेर सुपरिचित आहे. पर्यटन हा व्यवसाय म्हणून खऱ्या अर्थाने येथील लोकांनी स्वीकारला आणि फुलवला. मेघालयातील दालचीनी, हळद, काळे तीळ, लाल तांदूळ विशेष प्रसिद्ध आहेत. अशा निसर्गाने भरभरून सुंदर केलेल्या मेघालयाचे एकदातरी दर्शन घ्यावे पण त्यासाठी किमान ५-६ दिवस पूर्ण देणे गरजेचे आहे. तर मेघालय खऱ्या अर्थाने आपण पाहिले असे म्हणता येईल. ईशान्य भारतात गेलो अन आसाम आणि बांगलादेश यातील हा सुंदर प्रदेश पाहिला नाही असे होऊ नये.
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर 
7276051697
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.