भाग २ : सफर ‘चहा’ मळ्यांची

    13-Jun-2022
Total Views |

bhag2
फोटो स्थळ - तेजपूर जवळ असलेला चहा मळा
 
नागपूर : “वा, काय फक्कड चहा बनवलाय वहिनी तुम्ही?”
 
“मग आसाम स्पेशल आहे, खास ह्यांच्या गुवाहाटीच्या मित्राकडून मागवलाय बरं का? ”
 
असे संवाद भारतातील बहुतांश घरात आणि विशेषतः चहाचे दर्दी म्हणवल्या गेलेल्या अशा जमातीच्या लोकांकडून ऐकायला येत असतात. कधी चहा सांगितल्यावर बराच वेळ होऊन गेला तरी देखील स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध न आल्याने अस्वस्थ झालेल्या मंडळींच्या संवादात, “काय चहा आणायला आसामला गेलात वाटतं?” असा टोमणा मारण्यास देखील ही दर्दी मंडळी मागे पुढे पहात नाही.
 
तर अशा भारतीयांचे आणि जगभरातील चहा प्रेमींची तल्लफ पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या आणि जगाचे चहाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या आपल्याच भारतातील विस्तीर्ण चहा मळ्यात फिरायला गेल्यास किती आनंद होईल? भारताच्या पूर्वोत्तर भागातील हे राज्य म्हणजे आसाम, निसर्गाने आपल्या दोन्ही हातांनी भरभरून दिलेले सौंदर्य! एकाबाजूला उंचच उंच हिरव्या-निळ्या शुभ्र ढगांनी वेढलेल्या पर्वतरांगा, तर दुसऱ्या बाजूला नजर जाईल तिथंपर्यंत हिरवी पिवळी भात शेतं किंवा सुप्रसिद्ध चहाचे हिरवेगार मळे!
 
असे हे आसाम, चार गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे; पहिले- तिथले हिरवागार विशाल आकाराचे चहाचे मळे, दुसरे शांतपणे वाहणारा विशाल जलाने समृद्ध असलेला ब्रम्हपुत्र नद नदी नव्हे नद आहे), तिसरे महत्वाचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे काझीरंगा अभयारण्य, आणि चौथे किंवा चौथी आसामी म्हणजे शांत-धीर- गंभीर गळ्याचे गायक भूपेन हजारिका!
 
ब्रम्हपुत्रेच्या अगदी बाजूबाजूने रेल्वेतून जाताना किंवा प्रत्यक्ष रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दुतर्फा हिरवेकंच चहाचे मळे दिसतील. सिक्कीमचे दार्जीलिंग आणि आसामचा हा ब्रम्ह्पुत्रेचा दुतर्फा प्रदेश हा बहुतांश हिरव्या मोठमोठ्या चहा मळ्यांनी व्यापलेला दिसतो. या मळ्यात मध्ये मध्ये काही वृक्ष दिसतात आणि त्या वृक्षांना लपेटून मसाल्याचे वेल चढवले जातात. यात काळी मिरी प्रसिद्ध आहे.
 
आपल्या पाठीवर त्रिकोणी आकाराच्या बासाच्या टोपल्या घेऊन पुष्कळशा स्त्रिया ह्या हिरव्यागार मळ्यात चहाची पाने तोडताना आणि पाठीवरील टोपलीत टाकताना दिसतात. ही चहाची झाडे त्यांच्या कमरे इतकी म्हणजे साधारण जमिनीपासून अडीच तीन फुटाची, परंतु या झाडांचे वय खाली वाकून बघितल्यास त्यांच्या जाड अशा खोडावरून कळते. त्याची छाटणी केली जाते, छाटणी केल्यावर नवी पालवी फुटून नवा चहा आपल्याला मिळतो. ही तोडणी वर्षातून तीन वेळा केली जाते. नव्या चहा रोपट्यांची लागवड ऑक्टोबर नोवेंबरमध्ये केली जाते.
 
बहुतांश स्त्रिया या तोडणी कामात असतात. सकाळी ८ वाजता यांचे काम सुरु होते ते दुपारी ४ वाजता संपते. दिवसभर उन्हात उभे राहून काम करावे लागत. त्यांच्या पाठीवरील टोपलीत अंदाजे ५ किलो चहा पत्ती भरता येते, जी अनेक वेळा मोजली जाऊन त्यांची रोजदारी ठरते जी साधारणपणे २०० रु इतकी भरते. दिवसाला साधारण ४० - ५० किलो चहा पत्ती येथील एक मजूर स्त्री तोडते. तर पुरुष फवारणी, कारखान्यात यंत्रे हाताळणे आदी कामे करतात. या चहा पिकांवर नाइट्रोजन, फॉस्फरस, पोटेशियम फवारले जाते.
 
चहा मळ्यांच्या लागून मळ्यात काम करणाऱ्या लोकांची गावे आहेत. ‘सदानी’ या नावाने हा समाज ओळखला जातो. मूलतः ब्रिटीशांनी चहा मळे इथे लावले खरे पण यात काम करयाला मजूर नव्हते. ते त्यांनी उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसा या राज्यातून गरीब लोकांना मारून मुटकून येथे आणले गेले. त्यांच्या कित्येक पिढ्या या इथेच वसल्या आहेत. सदानी जनजाती जनसंख्या थोडी थोडकी नाही, तर फार मोठी आहे. जवळपास एक कोटी इतकी. राज्याच्या लोकसंख्येच्या साधारण ३० टक्के इतकी सहज भरेल. पण हा समाज अजूनही दुर्लक्षित, गरीब, अशिक्षित म्हणून उपेक्षेचे जीवन आजही जगत आहे. मूळ आसामच्या लोकांशी यांचा व्यवहार अजूनही बरोबरीचा झालेला नाही ही वास्तविकता आहे.
 
भारतात या चहाच्या जन्माची कथा जोडली जाते ती ब्रिटीशांशी. सन १८१५ मध्ये काही इंग्रजांना येथील स्थानीय लोक, काही जनजातीय समुदाय आपल्या नित्य वापरात चहापत्तीचा वापर पेय आणि भाजी इ प्रकाराने करताना आढळला. सन १८३४ भारताचे गव्हर्नर लॉर्ड बेन्टीक यांनी चहा उत्पादन आणि संभावना शोधण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी एक कमिटी बनवली. कमिटीचा रिपोर्ट सकारात्मक आला. दार्जीलिंग आणि आसाम या परिसरात उद्योग म्हणून हळूहळू चहा मळे विकसित होऊ लागले. सन १८८१ मध्ये इंडियन टी असोसिएशनची स्थापना झाली. या पूर्वी चीन मधील चहा हा जगभरात वापरला जाई. चहावर चीनचा हा एकाधिकार होता. तो तोडण्यासाठी इंग्रजांनी पुढे पद्धतशीरपणे भारतात चहाची लागवड करून त्याला व्यापारिक वाणिज्यिक उत्पादन करण्याचे ठरवले. त्यांनी चीनमधून चहा चे बीज, रोपणपद्धती आणि तंत्र यांचा अभ्यास करून आसाममध्ये चहा मळे विकसित करायला सुरवात केली. १९०१ पर्यंत भारतात चहा बाजार मोठ्या प्रमाणात तयार झाला किंवा केला गेला.
 
आजच्या घडीला भारत हा चहाचा जगातील मुख्य उत्पादक देश आहे, उत्पादनात २७ टक्के वाटा आहे आणि म्हणून प्रमुख निर्यातदार देश आहे. जवळ जवळ ८० देशांना चहाची निर्यात केली जाते. भारताच्या या उत्पादनात आसामचा वाटा ५७ टक्के तर जगभराशी तुलना केल्यास एकट्या आसामचा वाटा २२ टक्के इतका मोठा आहे.
 
देशाचा सगळ्यात जास्त चहा उत्पादक राज्य आसाम असून येथे ८०० मोठे आणि ६००० लहान चहा मळे आहेत. यातून प्रत्यक्ष २० लाख लोकांना रोजगार मिळतो. उत्पादक, विक्रेते, खरेदीदार , वेअरहाउस गोदामात काम करणारे, परिवहन व्यवसायातील लोक असा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार देणारा हा चहा उद्योग आहे.
 
रशिया हा आपल्या या चहाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. त्यानंतर, ब्रिटन, फ्रांस, मध्य आशिया हे आपल्या चहाचे मोठे चाहते देश आहेत. कडक स्वाद आणि रंग यासाठी आसाममधील चहा प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्र आणि बराक या दोन्ही नद्यांच्या काठावरील मैदानी प्रदेशात हे चहा मळे पसरले आहेत. ताज्या चहा पत्तीत टेनीनचे प्रमाण २५ टक्के असते, तर प्रक्रियेनंतर ते १३ टक्केपर्यंत कमी होते.
 
मार्च २०२० ला देशात लॉकडाउन लागले आणि चहापत्ती तोडणीचा सुरु होणारा हंगाम तिथेच थांबला. गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरमध्ये फक्त १९५ मिलियन किलोग्राम चहाचा लिलाव झाला. त्याआधीच्या वर्षी एकूण चहाचे उत्पादन ६५५ मिलियन (दहा लाख = १ मिलियन) किलोग्राम उत्पादन आणि विक्री झाली होती. इतके प्रचंड नुकसान कोरोनामुळे आसामच्या या चहा उद्योगाचे झाले आहे.
 
केंद्रात आल्यापासून मोदी सरकारने ‘एकट इस्ट’east हे धोरण स्वीकारले आणि पूर्वेकडे बघण्याचा दिल्लीचा दृष्टीकोन बदलला. विकासाचे नवे वारे इथे आता वाहू लागले आहेत. चौपदरी रुंद गुळगुळीत रस्ते, नद्यांवर मोठे पुल, विजेची जोडणी, लघु उद्योगांचे वाढलेले महत्व एक ना अनेक. यातून झपाट्याने विकासाची पाऊले या चहा मळ्यात देखील पोहोचली नसती तर नवल. केंद्र सरकारने चहा मळ्यात एक क्लब हाउस बनवले आहे. लहान मुलांसाठी पाळणे, बैठक करू शकतात. त्यांचे जीवन अधिक सुसह्य करावे आणि जगाला आनंद देणारा हा प्रदेश आणि त्यातील लोक अधिक आनंदी होवोत हीच अपेक्षा आणि सदिच्छा!\
 
 
- प्रसाद बरवे,
नागपूर
7276051697 
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.