World Tuberculosis Day 2022 : टीबीच्या 'या' सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा...

    12-Jun-2022
Total Views |

tb
(Image Source : Internet)
 
नागपूर : दरवर्षी २४ मार्च रोजी जगभरात जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश क्षयरोगाच्या आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा आहे. जगभरात लाखो लोक टीबी आजाराशी झुंज देत आहेत. हा एक गंभीर जीवाणूजन्य (Bacterial) संसर्ग आहे, जो फुफ्फुसांवर परिणाम करतो. त्यानंतर तो हळूहळू तुमच्या मेंदू आणि मणक्यासारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो.
 
टीबीची लक्षणे
 
१. टीबीच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक खोकला आहे जो दीर्घकाळ चालतो. हा खोकला २-३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ असतो. टीबीमध्ये येणारा खोकला कोरडा नसतो आणि त्यातून लाळ आणि श्लेष्माही बाहेर पडतो.
२. खोकल्यासह रक्त येणे
३. छातीत दुखणे किंवा श्वास घेताना वेदना जाणवणे
४. जलद वजन कमी होणे
५. अत्यंत थकवा
६. ताप
७. रात्री घाम येणे
८. थंडी वाजून येणे
९. भूक न लागणे
ही सर्व टीबीची सामान्य लक्षणे आहेत.
 
टीबी का होतो
 
क्षयरोगाची लागण झालेली व्यक्ती जेव्हा खोकलते, शिंकते किंवा हसते तेव्हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिसचे जीवाणू हवेतून व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, ज्यामुळे टीबी होतो. तज्ज्ञांच्या मते, हे बॅक्टेरिया खूप सहज पसरतात. पण असे असूनही टीबीची लागण होणे इतके सोपे नाही. याचा सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम होतो. परंतु, याशिवाय लिम्फ ग्रंथी, पोट, पाठीचा कणा, सांधे आणि शरीराच्या इतर भागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
टीबीचे प्रकार
 
टीबी संसर्गाचे २ प्रकार आहेत. सुप्त टीबी आणि सक्रिय टीबी. सुप्त टीबीमध्ये रुग्ण संसर्गजन्य नसतो आणि कोणतीही विशिष्ट लक्षणे दाखवत नाही. यामध्ये, संसर्ग शरीराच्या आतच असतो आणि तो कधीही सक्रिय होऊ शकतो. तसेच सक्रिय टीबीमध्ये जंतू अनेक पटीने वाढतात आणि तुम्हाला आजारी बनवतात. अशा परिस्थितीत, हा रोग इतरांना देखील पसरू शकतो. ९० टक्के सक्रिय टीबी प्रकरणे सुप्त टीबी संसर्गामुळे होतात. कधीकधी हे ड्रग रेजिडेन्ट देखील बनते म्हणजेच काही औषधे त्याच्या जीवाणूंवर काम करत नाहीत.
 
कोणत्या लोकांना अधिक धोका
 
जर तुमच्या मित्राला किंवा सहकाऱ्याला सक्रिय टीबी आहे, तर तुम्हालाही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. रशिया, आफ्रिका, पूर्व युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन यांसारख्या प्रदेशात वास्तव्य किंवा प्रवास केलेल्या लोकांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते. कारण येथे टीबीचा आजार सामान्य आहे. एचआयव्हीची (HIV) लागण झालेले लोक, बेघर किंवा तुरुंगात राहणारे लोक किंवा जे लोक इंजेक्शनद्वारे ड्रग घेतात अशांमध्ये टीबीचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच टीबीच्या रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी देखील त्याला बळी पडतात. याशिवाय धूम्रपान करणाऱ्यांना टीबी आजाराचा नेहमीच धोका असतो.
 
टीबीचा उपचार
 
क्षयरोगाची लक्षणे दिसू लागताच तातडीने उपचार सुरू करावेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोक जितकी जास्त वेळ प्रतीक्षा करतात त्यांची स्थिती तितकीच वाईट होते. लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. क्षयरोगाचा (टीबी) उपचार साधारणपणे सहा महिन्यांच्या कालावधीत केला जातो.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.