सेक्सटॉर्शन : ऑनलाईन फसवणुकीचा नवा मार्ग

    12-Jun-2022
Total Views |

sextortion1
(Image Source : Internet)
 
 
नागपूर : सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट आज जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेटचे स्वरूप जसे विस्तारित गेले तसे ऑनलाईन गुन्हेगारीही विस्तारित गेली. ऑनलाईन गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची सायबर शाखा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असे असतानाही ऑनलाईन गुन्हे करणारे नवनवीन मार्ग शोधून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करत असतात. या फसवणुकीला केवळ सर्वसामान्य नागरिकच नाही तर नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर यांसारखे प्रतिष्ठित नागरिक देखील बळी पडतात. या सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीचा मार्ग शोधून काढला आहे. तो आहे सेक्सटॉर्शन.
 
अलीकडच्या काळात ऑनलाईन लैंगिक छळाचे प्रमाण वाढले असून त्यातूनच सेक्सटॉर्शन हा शब्द निर्माण झाला आहे. सेक्सटॉर्शन म्हणजे खंडणी तसाच लैंगिक खंडणी म्हणजे सेक्सटॉर्शन. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटचा यासाठी वापर केला जातो. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवरुन तुम्हाला एका अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती फ्रेंड रिक्वेस्ट माहिती न घेता स्वीकारली जाते. नंतर मेसेंजरच्या माध्यमतातून चॅटिंग केली जाते. त्यानंतर एकमेकांचे व्हॉट्सॲप नंबर घेऊन व्हॉट्सॲपवर चॅटिंग होते. चॅटिंग बरोबरच व्हिडिओ कॉल, व्हॉट्सॲप कॉल करण्यास सुरुवात होते. समोरची व्यक्ती अंगप्रदर्शन करून अश्लील हावभाव करते. समोरच्या व्यक्तीला मोहात अडकवले जाते. त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून विवस्त्र अश्लील बाबी करून घेतल्या जातात.
 
sextortion2 (Image Source : Internet)
 
विशेष म्हणजे या सर्वांचे व्हिडिओ ऑन स्क्रीन रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर काही दिवसांच्या फरकाने तुम्हाला मेसेज, फोन कॉल करून पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारे लैंगिक खंडणी सेक्सटॉर्शनची मागणी केली जाते. यात प्रामुख्याने कॉलेजमधील विद्यार्थी व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना टार्गेट केले जाते. यात फसणारे बदनामीला घाबरून या सायबर गुन्हेगारांना हवी ती रक्कम देतात. बऱ्याचदा रक्कम देऊनही पुन्हा मागणी केली जाते. त्यामुळे फसवले गेलेले मानसिक तणावात येतात, त्यातून ते आत्महत्येचा मार्गही स्वीकारतात. या प्रकाराला बळी पडून काही जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
 
सेक्सटॉर्शन हा पैसे कमावण्याचा नवा मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. या सायबर गुन्हेगारांना पकडणे सायबर पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. कारण हे गुन्हेगार राज्याबाहेर किंवा देशाबाहेरचेही असू शकतात. या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. कोणाचीही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. आपली फ्रेंड लिस्ट आणि फॉलोअर्स वाढवण्याचा अट्टाहास आपले आर्थिक व मानसिक नुकसान करू शकतो. आजची तरुणाई सोशल मीडियाची मोठी फॅन बनली आहे. इंटरनेट, मोबाईल ही तरुणांची जीवनावश्यक गरज बनली आहे. मात्र याचा वापर समाजहिताच्या गोष्टी जोपासण्यासाठी झाला तरच उत्तम नाहीतर तुमची एक चूक तुमच्या जिवावरही बेतू शकते. म्हणूनच प्रत्येकाने सावधगिरी बाळगून सोशल मीडियाचा वापर करावा.
 
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.