मायक्रोवेव्ह, एअर फ्रायरमध्ये फ्रोजन चिकन गरम करताय? मग आधी 'हे' वाचा

    09-Dec-2022
Total Views |
 
- ठरू शकते आरोग्यासाठी घातक

frozen chicken cooking in microwave & air fryer (Image Source : Internet/ Representative image)
 
 
नागपूर :
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळचा अभाव असतो. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपली कामे अगदी सोप्या आणि कमीतकमी वेळात पूर्ण होईल, याच्या प्रयत्नात असतात. हल्लीच्या अत्याधुनिक स्वयंपाकघरात देखील अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक काम करण्यासाठी आधुनिक उपकरणांचा उपयोग व्हायला लागला आहे.
 
अशाच उपकरणांमध्ये मायक्रोवेव्ह आणि एअर फ्रायरचा देखील समावेश आहे. मायक्रोवेव्हच्या मदतीने एकदम कमी वेळात अन्न गरम करता येते, वेगवेगळे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतात, हे आपण जाणतोच. तसेच एअर फ्रायरच्या मदतीने तुम्ही डीप फ्राय करणारे पदार्थ अगदी कमी तेलाचा वापर करून तळू शकता. परंतु वेळ वाचवण्याच्या या प्रयत्नांमुळे त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यामुळे मायक्रोवेव्ह, एअर फ्रायरमुळे आपल्या आरोग्यावर कसा वाईट परिणाम होऊ शकतो, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
 
बाजारात अनेक प्रकारचे फ्रोझन फूड्स मिळतात. आजकाल प्रत्येक घरात या चवीला चमचमीत लागणाऱ्या आणि Easy to Cook फूड्सचा हमखास वापर केला जातो. पण, याच फ्रोझन फुड्सचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. अशातच नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी आवडीचे असलेले फ्रोजन स्टफ्ड चिकन देखील योग्यरीत्या बनवले नाही तर ते देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
 
एका अहवालानुसार, बाजारात मिळणारे फ्रोजन स्टफ्ड चिकन फूड हे मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायरमध्ये गरम केल्यास ते विषारी होऊ शकते. या अहवालानुसार, ब्रोकोली आणि पनीर यांचे सारण असलेले स्टफ्ड चिकन, चिकन कॉर्डेन ब्लू, आणि चिकन कीव सारखे ब्रेडेड पदार्थ शिजवण्यासाठी त्याला पारंपरिक ओव्हनमध्ये गरम करण्याची आवश्यकता असते. योग्य पद्धतीने शिजवले नाही तर ते कच्चे राहू शकते.
 
फ्रोझन स्टफ्ड चिकनमध्ये आढळतो साल्मोनेला
फ्रोझन स्टफ्ड उत्पादनांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतो. हा एक असा जिवाणू आहे, ज्याच्या संसर्गाने एखाद्या व्यक्तीला पोटाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हा विषाणू केवळ एका विशिष्ट तापमानातच नष्ट होतो. हा बॅक्टेरिया नष्ट होण्यासाठी ज्या तापमानाची आवश्यकता असते ते मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायरमध्ये मिळत नसल्याने ते सक्रिय राहतात. परिणामस्वरूपी तो पदार्थ विषारी होऊन त्याचे सेवन करणाऱ्याला फूड पॉइजनिंग होऊ शकते.
 
साल्मोनेला विषाणूचा प्रादुर्भाव हा अतिशय गंभीर ठरू शकतो. अहवालानुसार, गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेत जवळपास १.३५ कोटीहून अधिक लोक संक्रमित झाले होते. ज्यामुळे ४२० लोकांचा मृत्यू देखील झाला होता. अमेरिकेबरोबर फिनलँडमध्ये देखील साल्मोनेला विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.