हिवाळ्यात बनवा गरमागरम मटारच्या चटपटीत करंज्या

    29-Dec-2022
Total Views |

green peas gujiya
 (Image Source : Internet/ Representative image)
 
नागपूर :
हिवाळा आला की प्रत्येकाच्याच घरात मोठ्या प्रमाणात मटार आणला जातो. अशात जवळपास रोज सर्वच भाज्यांमध्ये मटारचा वापर होत असल्याने घरातील लहान मुळेच नाही तर इतर सदस्य देखील मटार खाण्यास कंटाळा करतात. पण हंगामी भाज्या, फळे खाणे देखील तितकेच महत्वाचे असून आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. अशा परिस्थिती घरातील गृहिणींसमोर मात्र मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे की असा कोणता पदार्थ बनवावा जेणेकरून घरातील सदस्यांना एका नवीन आणि चविष्ट पदार्थही मिळेल आणि हंगामी भाज्याही खाल्ल्या जातील.
 
तुम्ही मटारचे पराठे, टिक्की, कटलेट, मटारची कचोरी तर तुम्ही खाल्लीच असेल. त्यामुळे आज आपण मटारच्या नवीन पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत. वेगळ्या प्रकारची चटपटीत मटार करंजी (Green Peas Gujiya) कशी बनवायची, ते आज आपण बघूया.
 
साहित्य :
मटार - २ वाट्या,
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी,
आले + लसूण + मिरचीचे पेस्ट - १ चमचा,
लिंबाचा रस - १ चमचा,
धने + जिरे पावडर - १/२ चमचा,
मीठ - चवीनुसार,
बारीक चिरलेला कोथिंबीर - अर्धी वाटी,
मैदा - दीड वाटी,
कणिक (गव्हाचे पीठ) - १/२ वाटी,
तेल - तळण्यासाठी
 
कृती :
सर्वप्रथम पारीसाठी एका भांड्यात मैदा आणि कणिक एकत्र करा. त्यात चिमूटभर मीठ आणि तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाली की झाकून ठेवा. यानंतर मटारला उकळून घेऊन थोडे थंड झाले की चांगल्याने मॅश करून घ्या. आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा थोडा मऊसर झाला की त्यात आले-लसूण-मिरचीची पेस्ट घाला. यानंतर पॅनमध्ये मॅश केलेले मटार, धने-जिरे पावडर, मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घ्या. पॅनवर झाकण ठेऊन सारणाला एक वाफ काढून घ्या. यानंतर सारण एका बाऊलमध्ये काढून थंड करून घ्या.
 
आता मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे बनवून त्याची पुरीच्या आकाराची पातळ पारी लाटून घ्या. आता यामध्ये मटारचे सारण घालून करंजीचा आकार देऊन सर्व बाजूने कडा बंद करून द्या. करंज्या तयार झाल्या की एका कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर करंज्या तळून घ्या. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत करंज्या तळून घ्या. तयार आहेत चमचमीत आणि चविष्ट अशा मटारच्या करंज्या. टोमॅटो केचपसोबत तुम्हा या करंज्या सर्व्ह करू शकता.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.