जगावर 'ब्रेन ईटिंग अमिबा'चे नवे संकट? हा नेमका कोणता आजार आहे, जाणून घ्या

    29-Dec-2022
Total Views |

brain eating ameba
 (Image Source : Internet/ Representative image)
 
नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना संसर्गाच्या परतीमुळे दहशतीची लाट पसरली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. येथील परिस्थिती पाहता इतर देशांनी देखील खबरदारी म्हणून पुन्हा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. जगापुढे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना सर्वांना थक्क करणारा आणखी एक नवा आजार समोर आला आहे. 
 
दक्षिण कोरियामध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण जाणून येथील विशेषज्ञ देखील हैराण आहेत. दक्षिण कोरियामध्ये 'नेग्लेरिया फॉवलेरी' या नव्या संसर्गामुळे नुकताच एका माणसाचा मृत्यू झाला. थायलंडहून परतलेल्या एका दक्षिण कोरियन माणसाचा नेग्लेरिया फॉवलेरी संसर्गामुळे मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. हा संसर्ग सामान्यतः उबदार गोड्या पाण्यात आढळणाऱ्या 'ब्रेन ईटिंग अमिबा'मुळे (Brain Eating Ameba) झाल्याचे समोर आले आहे.
 
मृत व्यक्तीमध्ये ही आढळली लक्षणे
कोरियन डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेंशन एजेन्सी (KDCA) ने दिलेल्या माहितीनुसार, मृतकाला मेनिंजायटीसची लक्षणे दिसू लागली होती. त्यातील काही सामान्य लक्षणे होती. त्यामध्ये डोकेदुखी, ताप, उलट्या होणे, बोलण्यात अस्पष्टता येणे आणि मान कडक होणे इत्यादींचा समावेश होता. पोस्टमार्टम तपासणीनंतर व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले.
 
नेग्लेरिया फॉवलेरी किंवा ब्रेन ईटिंग अमिबा म्हणजे काय?
नेग्लेरिया फॉवलेरी संसर्गाला ब्रेन ईटिंग अमिबा असेही म्हणतात. युनायटेड स्टेट्सच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार, नेग्लेरिया फॉवलेरी हा एक अमिबा म्हणजेच एक पेशीय जीव आहे, यामुळे मेंदूमध्ये संक्रमण होऊ शकते. हा अमिबा माती, तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या उबदार गोड्या पाण्याच्या ठिकाणी आढळतात. नेग्लेरिया फॉवलेरीमुळे होणाऱ्या आजाराला 'प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस' असेही संबोधले जाते. याचा संसर्ग शरीरासाठी घातक असल्याचे वृत्त आहे.
हा आजार अगदी वेगाने पसरणारा असल्यामुळे 'प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस' ला त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे कठीण आहे. या आजाराच्या पहिल्या टप्प्यात तीव्र डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या होणे, मानेचा त्रास, बदललेली मानसिक स्थिती अशाप्रकारची लक्षणे दिसतात. तर, दुसऱ्या टप्प्यात मानसिक गोंधळाचा देखील अनुभव येऊ शकतो. गंबीर प्रकरणांमध्ये रुग्ण कोमामध्येही जाऊ शेतात.
 
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) म्हणण्यानुसार, सध्या नेग्लेरिया फॉवलेरी संसर्गाचा मनुष्य ते मनुष्य प्रसार झाल्याचा अद्याप कुठलाही पुरावा नाही. तसेच हे पाण्याच्या वाफेद्वारे किंवा एरोसोलच्या थेंबांद्वारे देखील पसरू शकत नाही. सध्या या आजाराच्या उपचारासाठी कुठलीही लस उपलब्ध नाही. परंतु काही औषधांच्या मदतीने यावर उपचार केला जाऊ शकतो.
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.