Human Rights Day 2022 : असे आहे जागतिक मानवाधिकार दिवसाचे महत्व आणि इतिहास

    10-Dec-2022
Total Views |

human rights day
 
 
नागपूर : 
मानवाधिकार हा सामान्य माणसासाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे आणि आपले मत ठामपणे मांडण्याचे स्वतंत्र आहे. परंतु, शिक्षणापासून वंचित असलेले, कुटुंबियांचे निर्बंध, विचारधारणा, राहणीमान, निरक्षरता, अशिक्षितता अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना त्यांचे अधिकार आणि हक्कांबद्दल माहिती नसते. याच पार्श्वभूमीवर लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल अवगत करण्यासाठी दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज आपण या दिवसाचे महत्व आणि इतिहास जाणून घेणार आहोत.
 
मानवाधिकार आणि त्याचा इतिहास
१० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी सर्वव्यापक मानवाधिकारांची घोषणा केली. त्यानंतर १९५० पासून संपूर्ण जगात १० डिसेंबर हा दिवस ‘मानवाधिकार दिन' म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. मानवी हक्क म्हणजे वैयक्तिक जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित काही अधिकार होय. मानवाधिकार हे असे मूलभूत अधिकार आहे, ज्यानुसार कुठल्याही मानवाला वंश, जात, जमात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग, इत्यादींच्या आधारावरून समाजापासून दूर किंवा वेगळे ठेवता येत नाही. या अधिकारांमध्ये आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक घटकांचा देखील समावेश आहे.

human rights day 
 
भारतातील मानवाधिकार काय आहेत?
भारतात लोकशाहीचे अनुसरण केले जाते. भारतात मानवाधिकारांतर्गत प्रत्येक व्यक्तीला समानता, स्वतंत्रता, न्याय, प्रतिष्ठा आरोग्य आणि विकासाचा अधिकार आहे. भारताच्या संविधानात देखील मानवाधिकारांची हमी देण्यात आली आहे. भारतीय मानवाधिकारामध्ये शिक्षण हे प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले गेले आहे. भारतात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवाधिकार कायदे लागू झाले असून १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
 
अशी आहे यंदाची थीम :
जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी एक थीम घोषित केली जाते. ही थीम संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे ठरविली जाते. यावर्षी जागतिक मानवाधिकार दिन २०२२ साजरा करण्यासाठी 'समानता, स्वातंत्र्य आणि न्याय' ही थीम ठरवण्यात आली आहे. जगभरात हा दिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांद्वारे मानवाधिकाराचे महत्व लोकांना सांगितले जात असून त्यांच्या अधिकारांबद्दल त्यांना अवगत केले जाते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.